Breaking News

पहिल्या तिमाहीत भारताचा विकासाचा वेग मंदावला

नवी दिल्ली, दि. 18 -  चालू आर्थिक वर्षाच्या (2016-17) पहिल्या तिमाहीत भारताचा विकासाचा वेग मंदावला असल्याचे अ‍ॅम्बिट या संस्थेने म्हटले आहे.  2015-16च्या शेवटच्या तिमाहीत वेग घेतलेल्या आर्थिक उलाढालींचा वेग शाश्‍वत राहिलेला नाही.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मंदावलेला विकासाचा दर उतरत चाललेले खासगी भांडवल आणि बँक कर्जावर मर्यादा यामुळे पूर्ण वर्षात वेग घेऊ  शकणार नाही, असेही अ‍ॅम्बिटने म्हटले आहे. वित्तीय सेवा आणि गुंतवणूक संशोधन संस्था असलेल्या अ‍ॅम्बिटचा दबदबा आहे. त्यामुळे त्यांच्या अहवालास आर्थिक  वर्तुळात महत्त्व दिले जाते.
2016-17च्या पहिल्या तिमाहीतील आकडेवारी पाहता एप्रिल ते मे दरम्यान विकासाचा वेग निश्‍चितच घसरला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याही पुढे, चालू  आर्थिक वर्षात विकास वेग घेण्याची शक्यता नाही आणि 2015-16च्या तुलनेत सपाटच राहील, असेही सागितले आहे.
खासगी क्षेत्राची संथगतीने होणारी वाढ, सरकारी भांडवली विनिमयाची माफक वाढ, भांडवली ओघाचे उतरलेले प्रमाण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला देण्यात  येणा-या बँक कर्जाचा गळाच दाबल्याने ही अवस्था ओढवली आहे,असे अ‍ॅम्बिटने म्हटले आहे. क्षेत्रीय तसेच प्रमुख आर्थिक घटकांतील घसरणीच्या संकेतांमुळे  विकास निश्‍चितच मंदावला आहे.