Breaking News

अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या

औरंगाबाद, दि. 05 -  आंबेडकरनगरातील पोषण आहारामध्ये अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली. संतप्त पालकांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. महिला व  बालविकास विभागामार्फत गोरगरिबांना व झोपडपट्टी वसाहतीमधील बालकांना आणि गरोदर महिलांना पोषण आहार दिला जातो. आंबेडकरनगर येथे नऊ  अंगणवाड्यांमध्ये दोनशे ते तीनशे लहान मुलांना पोषण आहार दिला जातो. गल्ली नं. 11 मध्ये असलेल्या अंगणवाडी क्र. 44 मध्ये शनिवारी सकाळी अकरा वाजता  पोहे आणि हरभर्‍याची उसळ आणण्यात आली. वाटप झाल्यावर बर्‍याच मुलांनी अंगणवाडीमध्येच पोहे खाल्ले; मात्र एका मुलीने पोहे घरी आणले. त्यात मोठ्या  अळ्या मुलीच्या बहिणीला दिसल्या. आई सर्व पोहे घेऊन अंगणवाडीत गेल्यानंतर तेथे गर्दी झाली.
अंगणवाडी सेविकेला विचारल्यानंतर सुरवातीलाच उद्धट उत्तरे त्यांनी दिल्याचा आरोप पालकांनी केला. संतप्त पालकांनी पर्यवेक्षिकेला बोलावले. त्यानंतर महिला  बालविकास अधिकारी कमल इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोह्यांचे नमुने घेतले. आहाराचे नमुने प्रयोगशाळेला पाठवून योग्य कारवाई करण्यात येईल; मात्र  तुम्ही हे प्रकरण मिटवून घ्या, माध्यम प्रतिनिधींना बोलावू नका अशी भूमिका घेतल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे.
येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार येथे प्रत्येक दिवशी मिळणार्‍या आहारात नीटनेटकेपणा नसतो. निकृष्ट पद्धतीचा आहार पुरवला जातो.
आंबेडकरनगरामध्ये मोलमजुरी करून उपजीविका भागवणारे सत्तर टक्केपेक्षा अधिक नागरिक आहेत. सकाळीच आई-वडील कामावर निघून जातात. त्यांच्या  माघारी मुलांना निकृष्ट भोजन मिळत असेल याची कल्पना नव्हती, असे पालकांनी बोलून दाखवले.
महिला बालक विकास प्रकल्प अधिकारी हर्षा देशमुख यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांना अनेकदा मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन  बंद होता. त्यामुळे या प्रकरणात काय कारवाई करणार हे समजू शकले नाही.