Breaking News

धनगर समाजाला न्याय देणार ः ना.मुंढे

जामखेड, दि. 01 - सत्तेत असतानाच आमचे सरकार धनगर समाजाला आरक्षण देवून न्याय देणार असल्याचे राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आश्‍वासन देतानाच चोंडी गावाच्या सर्वांगिण विकासासाठी हे गाव दत्तक घेण्याची घोषणा त्यांनी केली आहे .
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 291 व्या जयंतीनिमित्त  तालूक्यातील चोंडी येथे  पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने झालेल्या जयंती कार्यक्रमात ग्रामविकासमंत्री मुंडे बोलत होत्या . माजी मंत्री आ गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राजस्थानचे उद्योगमंत्री गजेंद्रसिंह , जयंती उत्सवाचे स्वागताध्यक्ष व पालकमंत्री प्रा राम शिंदे  ,माजी मंत्री अण्णासाहेब डांगे , खा दिलीप गांधी , आ.अनिल गोटे , आ.रामहरी रूपनवर , आ.रामराव वडकुते ,आ.नारायण पाटील , आ.दत्तात्रय भरणे , आ.शिवाजी कर्डीले , आ. बाळासाहेब मुरकुटे , आ. मोनिका राजळे , आ. भीमराव धोंडे , माजी आमदार पोपटराव गावडे ,रमेश शेंडगे ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा भानूदास बेरड ,  जेष्ठ नेते बाळासाहेब गावडे ,धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनूमंतराव सूळ, मच्छिंद्र ठवरे ,गोपीचंद पडळकर , कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत , सभापती डॉ भगवान मुरूमकर , बाजार समितीचे सभापती  गोतम उत्तेकर , सुर्यकांत मोरे यांच्यासह तब्बल 25 हजारहून अधिक  लोक उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या, आरक्षणापासून मागील सरकारने गेली 65 वर्ष वंचित ठेवले मात्र आमचे सरकार कायद्यानेच आरक्षण देणार असून ,याच सत्तेत आरक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले . तर जलयुक्त शिवार योजनेतून सीना नदीचे पुर्नजीवन करण्यासाठी  लागणारा निधी दिला जाणार असल्याचे सांगताना 15 दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी  जिल्हा प्रशासनाला दिले.पुण्यश्‍लोक अहिलयादेवी होळकरांचे जन्मगाव चोंडी प्रेरणास्थळ झाले पाहिजे त्यासाठी लागणारा निधी दिला जाणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले .मुंडे म्हणाल्या  , मी 11 वर्षाची असतानाच  अहिल्यादेवींचे चारित्र वाचले. वडिलांच्या निधनानंतर दु:ख पचविण्याची ताकद अहिल्यादेवींनीच दिली असल्याचे त्यांनी सांगितले .राजस्थानचे उद्योगमंत्री गजेंद्रसिंह  यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांचे  भाषण वाचून दाखविले, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे यांनी आपल्या भाषणात चोंडीला अहिल्यादेवींच्या नावाने मुक्त विद्यापीठाची स्थापना करावी त्याचबरोबर सीना नदी पुर्नजीवन करावे अशी मागणी केली. प्रास्तविक भाषणात पालकमंत्री प्रा शिंदे म्हणाले , पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जन्मगाव म्हणून चोंडी येथे साजरी करणे गरजेचे होते त्यामुळेच आपण जयंती कार्यक्रम प्रथमच स्वत साजरी केल्याचे त्यांनी सांगितले .सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवींचे नाव देण्याचा प्रश्र मार्गी लागला असून आरक्षणाचा प्रश्रही नक्कीच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले .अहिल्यादेवींची सेवा करून जसे मला मिळाले तसे तूम्हालाही मिळणार असल्याचे  भावनिक आवाहण त्यांनी सांगितले .यावेळी खा गांधी, आ. अनिल गोटे, आ. रामहरी रूपनवर, आ रामराव वडकुते,आ नारायण पाटील , आ शिवाजी कर्डीले  यांची यावेळी भाषणे झाली .सुत्रसंचलन गौरी जोशी व निलेश दिवटे यांनी केले .तर आभार लहू शेवाळे यांनी मानले.