Breaking News

आमचं गाव आमचा विकास कार्यक्रम यशस्वी करा : अश्‍विन मुद्गल

सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : सर्व विभागांनी गाव पातळीवर काटेकोरपणे नियोजन करावे. सर्वस्तरांवर सर्वसमावेश प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण करुन ग्रामसंसाधन गट स्थापन करावेत आणि आमचं गाव आमचा विकास केंद्र शासनाचा पथदर्शी कार्यक्रम यशस्वी करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी दिल्या. 
आमचं गाव आमचा विकास क्षमता बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय बैठक येथील नियोजन भवनात घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी मुद्गल बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, रोहयो उपजिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांनी सर्वांचे स्वागत करुन संगणकीय सादरीकरण केले. पाटील यावेळी म्हणाले, ज्या पध्दतीने आपण आपले कुटूंब चालवितो त्या पध्दतीने ग्रामपंचायतस्तरावर मानवी विकास निर्देशांकासाठी ग्रामविकास आराखडा तयार करावयाचा आहे. या अंतर्गत विविध विभागांनी सहभागी होवून प्रशिक्षण द्यावे. गावच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट यामध्ये ठेवून हा विकास आराखडा करावा. यात एक पंचवार्षिक तर दुसरा वार्षिक आराखडा करावयाचा आहे. हा आराखडा मानवी विकास निर्देशांकाला अनुसरुन सर्वसमावेशक असावा, असेही ते म्हणाले.
मुद्गल म्हणाले, आमचं गाव आमचा विकास हा केंद्र शासनाचा विशेष पथदर्शी कार्यक्रम आहे. मानवी विकास निर्देशांक म्हणजेच सामाजिक विकासावर भर देणे आवश्यक आहे. गावामध्ये जे संसाधन उपलब्ध आहे त्याचा काळजीपर्वूक उपयोग करुन त्यावर भर द्यावा. उपलब्ध असणारे मनुष्यबळ, प्राकृतिक संसाधन, गावासाठी त्याची उपयुक्तता, गावच्या विकासासाठी उपयोगात आणावे. त्या दृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून विकास आराखडा तयार करावे. यामध्ये प्रामुख्याने शाश्‍वत विकासाला प्रोत्साहन देणे, मानव विकास निर्देशांक उंचावणे याला केंद्रबिंदू मानून हा आराखडा तयार करावयाचा आहे.
शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे यासाठी अत्यंत बारकाईने नियोजन करावे लागणार आहे. पर्यावरण विषयक, सामाजिक शिक्षण, आरोग्य विषयक, कुपोषण निर्मूलन आदींबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. गावपातळीवर हा आराखडा सर्वस्तरावर, सर्वसमावेशक असला पाहिजे. सर्व विभागांनी आपल्या माहितीची देवाण-घेवाण करावी आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे पाटील यांनी आवाहन केले.
प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी यावेळी ग्रामसंसाधन गट स्थापनेबाबत सविस्तर माहिती दिली. बैठकीला जिल्हा परिषदेचे अभियंता दिलीप पालवे, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने उपस्थित होते.