Breaking News

विरोध डावलून ‘युवराजां’चाच होणार ‘राज्याभिषेक’

नवी दिल्ली, दि. 01 - नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाल्याने ‘युवराजां’च्या विरोधात पक्षातच कुजबूज सुरू असली तरी; ‘आता पक्षात खांदेपालट करण्याची वेळ झाली आहे;’ असे सांगत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी आता अन्य कोणाच्या तरी खांद्यावर देण्याची वेळ आता आली आहे; असे सूतोवाच सोनियांनी केल्याचा दावा पंजाबमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. राहुल हेच पक्षाचे पुढील सर्वोच्च नेते असतील; असेही त्यांनी सूचित केले.
मागील महिन्यात झालेल्या चार राज्यां
च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये राहुल यांच्याबद्दल नाराजीची हवा तयार झाली आहे. सन 2014 मध्ये प्रचाराची धुरा राहुल यांनीच वाहिली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला आस्मान दाखविले. त्यानंतर झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये राहुल यांनीच नेतृत्व केले आणि पक्षाला बहुतेक वेळा पराभवाला सामोरे जावे लागले.
या अनुभवामुळे राहुल हे पक्षाला नेतृत्व देण्यास असमर्थ असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये असून त्यांच्या ऐवजी प्रियंका गांधी वढेरा यांचे नाव पुढे केले जात आहे. दिग्विजय सिंह यांच्यासारख्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनीदेखील पक्षाला चांगले दिवस दाखविण्यासाठी ‘शस्त्रक्रिया’ करण्याची आवश्यकता बोलून दाखविली आहे. त्यांचीच री पक्षाच्या अनेक नेत्यांनी ओढली असली तरी सोनिया यांचा कल नेतृत्व राहुल यांच्याकडेच देण्याकडेच असल्याचे स्पष्ट होत आहे.पक्षाचे नेतृत्व कोणाकडे सोपवायचे याचा निर्णय सोनिया घेणार असून पक्ष आणि सर्व नेते त्यांच्या निर्णयाचा सन्मान करतील; असे कॅप्टन अमरिंदर यांनी स्पष्ट केले.
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून त्याचे नेतृत्व कॅप्टन अमरिंदर करीत आहेत. सध्या पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपचे सरकार आहे. आगामी निवडणुकीत बाजी मारण्यासाठी आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही चंग बांधला आहे.