Breaking News

पाझर तलावास मातीच्या भिंतीऐवजी काँक्रेटची भिंत बांधण्याची मागणी

शेवगाव / श. प्रतिनिधी । तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावास मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट काँक्रेटची भिंत बांधण्यासंदर्भात औरंगाबादचे विभागीय ंआयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन आले.
शेवगाव तालुक्यातील पुर्व भागात गोळेगाव परिसरातील पतळगंगा नदीवर सन 1971 साली दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेमधून मातीचा बंधारा (पाझर तलाव) तयार करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीमध्ये हा मातीचा बंधारा नादुरुस्त झालेला असून, यामधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. या बंधार्‍याची दोन डोंगराच्या नैसर्गिक साईटवर निर्मिती झाली आहे. हा परिसर पूर्ण डोंगराळ असून भगवान गडाच्या पायथ्यापासून सात दर्‍यांमधून या बंधार्‍यात पाणीसाठा उपलब्ध होतो. याचे पाणलोट क्षेत्र 4.75 चौ.कि.मी. पर्यंत आहे. या पाझर तलावाची साठवण क्षमता 15.18 द.ल.घ.फु. एवढी आहे. या परिसरात पर्जन्यमान चांगले असते.

गोळेगाव, नागलवाडी आदी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे शासनाला पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी टँकरवर प्रचंड खर्च करावा लागतो. शेतीसाठीदेखील कुठलेही शाश्‍वत पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे पर्जन्यमान जास्त असूनही कायम दुष्काळाच्या छायेमध्ये हा परिसर आहे.
तरी हा निसर्गरम्य परिसर दुष्काळमुक्त होण्यासाठी, विकासासाठी कोणत्याही तात्पुरत्या स्वरूपाचा प्रयोग न करता कायम स्वरूपी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सिमेंट काँक्रेटची भिंत तयार करण्यात यावी. ज्यामुळे तो प्रश्‍न पूर्णपणे कायमचा सोडविला जाईल. सोबत बंधार्‍याचे व परिसराचे चित्रीकरण केलेली सी.डी. देण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना जि.प. सदस्या हर्षदा काकडे, संजय आंधळे, सुनील आव्हाड, जालिंदर बर्डे, भागवत रासनकर, नारायण फुंदे, नवनाथ बर्डे, विकास आंधळे, हेमंत पातकळ आदी उपस्थित होते.

परिसरातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल
या सर्व भौगोलिक परिस्थितीचे निरीक्षण केल्यास या मातीच्या भिंतीच्या ऐवजी सिमेंट काँक्रेटची भिंत बांधल्यास गोळेगाव, राणेगाव, शिंगोरी, शेकटे बु, लाडजळगाव, बाडगव्हाण, आधोडी, दिवटे, शोभानगर, अंतरवाली खु, अंतरवाली बु, मंगरूळ खु, मंगरूळ बु, हसनापूर, कोळगाव, आदी गावातील पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटू शकतो. तसेच त्या परिसरातील वन्य जीवसंपदा, औषधी वनस्पती यांचे संगोपन व संवर्धन होऊ शकते. या परिसरात रामायण काळातील प्राचीन श्री क्षेत्र काशी केदारेश्‍वराचे देवस्थान आहे. हा परिसर निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित होऊ शकतो.