Breaking News

पुन्हा पाहायला मिळणार भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना

मुंबई, दि. 01 - क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधला क्रिकेटचा सामना बघण्याची संधी मिळणार आहे. आयसीसीने 2017साली होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून यामध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत.
2017 साली इंग्लंडमध्ये होणार्‍या या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बी मध्ये भारताबरोबर पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. इंग्लंडच्या एजबॅस्टन मैदानावर 4 जून 2017 ला भारत आपली चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली मॅच पाकिस्तानविरुद्ध खेळेल. ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, इंग्लंड आणि बांग्लादेशची टीम आहे. 30 सप्टेंबर 2015 ला आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये पहिल्या आठ क्रमांकावर असलेल्या टीम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार आहेत. दोन्ही ग्रुपमधल्या टॉप 2 टीम सेमी फायनलमध्ये खेळतील, तर 18 जून 2017 ला फायनल होईल. 18 दिवस चालणारी ही चॅम्पियन्स ट्रॉफी आजपासून बरोबर वर्षानी म्हणजेच 1 जून 2017 ला सुरु होईल. 18 जूनला ओव्हल मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल होईल.
याआधी 2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा विजय झाला होता. फायनलमध्ये धोनीच्या संघानं इंग्लंडचा पराभव केला होता. आता पुन्हा होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा संघ ट्रॉफी वाचवण्यासाठी मैदानात उतरेल. 2013 साली झालेली चॅम्पियन्स ट्रॉफीही इंग्लंडमध्येच झाली होती.