पाथर्डी, दि. 01 - विकास कामांच्या जोरावर स्वच्छ व पारदर्शक कारभार करत आणखी पंचवीस वर्षे सत्तेत राहू, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे. पाथर्डी तालुक्यातील सातवड येथे सुमारे साठ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आ. कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य मोहनराव पालवे होते. या वेळी आ. कर्डिले म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या बळावर सतत जनतेच्या सुख दु:खात जावून त्यांचे प्रश्न समजावून घेण्याचे काम करतो. मीसुद्धा एक शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मला शेतकर्यांचे प्रश्न व परिस्थिती माहीत आहे. यापुढील काळात शेतकर्यांनी मालाचे महत्व समजावून घेत आधुनिक पद्धतीची शेती करणे महत्वाचे आहे. छावण्या सुरू करण्यास थोडा उशीर झाला असला तरी पाऊस झाल्यानंतर लगेच चारा होणार नाही, त्यामुळे आणखी एक - दोन महिने छावण्या चांगला पाऊस होईपर्यंत सुरूच ठेवणार आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्तच्या माध्यमातून प्रत्येक गावात पाणी पातळी वाढवण्यासाठी बंधार्यातील गाळ काढणे, नवीन बंधारे बांधणे, कंपार्डमेंट बंङिंगसारखी कामे हाती घेतली. जलयुक्तचा लाभ प्रत्येक गावाने घ्यावा, असे आवाहन करत कर्डिले म्हणाले, ढोलेश्वर रस्ता , कुशाबा देवस्थान रस्ता सभामंडप असे अनेक कामे मार्गी लावली असून, सुरुवातीला खडीकरण व नंतर डांबरीकरण केले जाईल. केंद्रातील भाजपा सरकारला दोन वर्षे झाली. कुठेही भ्रष्टाचाराचा डाग लावून न घेता स्वच्छ कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा सुरू आहे. सातवडमध्ये बंडू पाठक, संभाजी वाघ एकत्र आल्याने आमच्यासारख्यांची अडचण आता दूर झाली, अशा शब्दांत आ. कर्डिले यांनी राजकीय शेरेबाजी केली. कार्यक्रमास माजी जि. प. सदस्य मोहनराव पालवे, बाबापाटील खर्से, वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे, तिसगाव संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब लवांडे, मिरी-तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, युवानेते वैभव खलाटे, बंडू पाठक, डॉ. भगवान वाघ, ज्येष्ठ नेते संभाजी वाघ, कोंडीभाऊ वाघ, यादवराव वाघ, हरिभाऊ कारखेले, कारभारी पाठक, भाऊसाहेब पाठक, रविंद्र भापसे, सुरेश चव्हाण, पुरुषोत्तम आठरे, तालुका कृषी अधिकारी गणेश मोरे, उपकार्यकारी अधिकारी डी.आर. पाटील, शाखा अभियंता यु.डी. कुमकर, बी.टी. सोनवणे, करांउे, गुंड, ग्रामसेवक खलेकर आदी उपस्थित होते.