Breaking News

पाण्यासाठी जिल्ह्यातील महिलांची वणवण

। दुष्काळाचे तीव्र पडसाद  । पाण्यासाठी शाळेला सुट्टी झाली तरी चालेल । पावसाची सर्वांनाच अपेक्षा 

अहमदनगर, दि. 01 - सध्या पाणी प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावतान दिसत असुन अनेकदा पाण्यासासाठी महिलांना वणवण करण्याची वेळ येत आहे. बालकांनाही शाळेच्या वेळेत शाळेपेक्षा पाण्याचे महत्त्व वाटत असल्याने अनेकदा शाळेत गेले नाही तरी चालेल पण पाणी मिळाले पाहिजे अशीच अपेक्षा मुलांमध्ये आहे.
गेली दोन ते तीन वर्षापासून राज्यावर दुष्काळाचं सावट गडद होत चालले आहे.  त्यामुळं पाणी टंचाईची समस्या वरचेवर गंभीर बनताना दिसत आहे. गेल्या वर्षी अपुर्‍या पावसानं खरिपाच्या हंगामातही फारसं पीक हाती लागलं नाही. नंतर परतीच्या पावसानं थोडाबहुत दिलासा दिल्यानं रब्बीची काही पिकं बरी आली. परंतु अलीकडं झालेल्या अवकाळी पाऊस तसंच गारपिटीनं फळबागांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झालं. यावरून नैसर्गिक संकटांचा ससेमिरा कायम असल्याचं स्पष्ट होतं. यापूर्वीचे काही दुष्काळ हे अन्नधान्याच्या टंचाईचे होते. या वर्षी  खरा प्रश्‍न आहे तो पिण्याच्या पाण्याचा. एका ताज्या अहवालानुसार प्यायला पाणी नसल्याने आणि हाताला रोजगार नसल्यामुळे ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढलं आहे. यातुन शहरातील लोकसंख्या झपाटयाने वाढत असुन अनेक समस्यानांही तोंड द्यावे लागत आह. शहरातील लोकसंख्या वाढली असली तरी शहरातील वस्ती वाढत असुन निसर्गसंपत्तीची मोठ्या प्रमणात वाट लागली आहे. इमारतीसाठी वृक्ष तोडी होत आहेत. यातुन निसर्गचक्रावर मोठा परिणाम होताना दिसत आहे.
 मराठवाडा, विदर्भातून मुंबई-पुण्याकडे येणार्‍या गाड्यांमध्ये दररोज काही कुटुंबं असतात. सरकार अन्नसुरक्षा योजनेचा कितीही गवगवा करत असले, तरी परिस्थिती अतिशय वाईट असून आर्थिक तरलता नसल्याने ही कुटुंबं कामाच्या आणि पाण्याच्या शोधात शहरांकडे येत आहेत. अहमदनगरसारख्या महत्त्वाच्या आणि मोठ्या शहरात काही भागात महिन्यातून चार ते पाच वेळेस पाणी येतं. ते ही आता मिळण्याची शक्यता नाही. नगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, जालना आदी जिल्ह्यांमधील स्थिती अतिशय भयावह आहे. गेल्या सहा वर्षांमधील पावसाची स्थिती पाहिली तर गेल्या वर्षी राज्यातील काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही पाण्याची टंचाई कायम राहण्याची शक्यता असल्याची भूजल विभागाची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. 1972 च्या दुष्काळात जेवढी जनावरं संपली नव्हती, तेवढी जनावरं आता दावणीला राहिलेली नाहीत. निम्म्या किंमतीत जनावरं विकावी लागली.
या दुष्काळाच्या परस्थितीवर मात करण्यासाठी उपाया योजना सरकारने राबवायला पाहिजे होत्या. जिल्यात यंदाच्या वर्षी अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहे. शेतकरी आत्महत्या अद्यापही सरकारला रोखता आल्या नाहीत. पाऊस लांबणीवर गेल्यास मोठी समस्या निर्माण होणार आहे. सध्या पिण्याच्या पाण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत असून भविष्यात पिण्याच्या पाण्यावरुन वाद निर्माण होतील यात शंका नाही. यासाठी आजच पाण्याची बचत करणे गरजेच आहे.