Breaking News

उपनगरात तीन दिवस पाणी व वीज पुरवठा खंडीत

। वीजेच्या लंपडावाबाबत नागरिकांचे औरंगाबाद रस्त्यावर आंदोलन । आश्‍वासनानंतर आंदोलक शांत 


अहमदनगर । प्रतिनिधी । 08 - सावेडीत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वीजपुरवठयाचा लंपडाव व पाणी पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरुन नागरिकांनी सोमवारी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. नगर-औरंगाबाद रस्त्यावर नागरिकांनी सायंकाळी रास्ता रोको आंदोलनाचा प्रयत्न केला. तोफखाना पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना समजावले. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी वीजपुरवठा काही तासात सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलक शांत झाले. 
वादळी पावसामुळे नगर शहरासह आजूबाजूच्या उपनगरातील वीज खांबांचे मोठे नुकसान झाले आहे. सावेडी उपनगरात मोठयाप्रमाणात वीज खांब पडले आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. ही परिस्थिती शनिवारच्या वादळी पावसानंतरची आहे. त्यातच रविवारी देखील वादळी पाऊस झाला. लागोपाठ झालेल्या वादळी पावसामुळे वीज खांबांचे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत तारा तुटल्या आहेत. काही ठिकाणच्या रोहित्रांचे नुकसान झाले आहे. या वीज उपकरणांची दुरुस्तीसाठी वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचार्यांचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. पण, उणिवांच्या अभावी कामाला दिरंगाई होत आहे.
वीज नसल्याने सावेडी उपनगरातील नागरिकांच्या दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे. पाण्यापासून ते घरगुती कामांबाबत देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. वीजपुरवठा कधी सुरू होणार याबाबत नागरिकांनी वीत कंपनीच्या सावेडीतील उपकार्यालयातील अधिकार्यांना प्रश्‍न विचारून हैराण करून सोडले आहे. तीन दिवस वीजपुरवठा नसल्याने सोमवारी शेवटी नागरिकांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी वीज कंपनीच्या सावेडीतील कार्यालयावर गर्दी केली. लोकप्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.
अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या रोषाला सामोरे जात होते. त्यातच काहींनी आंदोलनाची भूमिका घेतली आणि नगर-औरंगाबाद रस्त्यावर रास्ता रोकोचा प्रर्यंसुरू केला. तेवढयात तोफखाना पोलीस अतिरीक्त पोलीस बळ घेऊन सावेडीतील वीज कार्यालयावर दाखल झाले. त्यानंतर चर्चा करून आंदोलन थांबविण्यात आले. वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी तुटलेल्या वीज तारा व खांबाचे कामे पुर्ण केल्यानंतर वीजपुरवठा रात्री सुरू झाला. मात्र पाणी पुरवठा सुरु झालाच नाही. मंगळवारी दुपारी मात्र काही भागात पाणी पुरवठा झाला. अनेक भागात उशिरापर्यंत पाणी आलेच नाही.