Breaking News

शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना जामीन मंजूर

जळगाव, दि. 18 -  म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मयत सभासद हजर असल्याचे दाखवत नवीन कार्यकारिणी गठीत करून फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी शिवसेनेचे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला.
जिल्हा व उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने आमदार गुलाबराव पाटील हे 16 जून रोजी जळगाव येथील न्या.एस.पी. देवरे यांच्यापुढे शरण आले. त्यानंतर त्यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत 17 रोजी संपल्याने पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली हो
ती. त्यानंतर जामिनासाठी अर्ज केला असता त्रयस्थ अर्जदाराने त्यांच्या जामिनावर हरकत घेतली होती. न्यायालयाने 17 रोजी जामिनावर निर्णय दिला नव्हता, त्यामुळे गुलाबराव पाटील यांचा मुक्काम जिल्हा कारागृहात होता. 18 रोजी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
काय आहे प्रकरण?
1991 मध्ये म्हसावदच्या पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेची स्थापना झाली होती. त्यानंतर 2012 पर्यंत संस्थेचे 6 सभासद हे मयत झाले होते. असे असताना आमदार गुलाबराव पाटील यांनी 20 एप्रिल 2008 रोजी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी अजेंडा काढला. त्यानंतर 30 एप्रिल 2008 रोजी ही सभा घेण्यात आली. संस्थेचे सभासद महारू काशीनाथ बेलदार हे 18 ऑगस्ट 1996 रोजी मयत झालेले असताना ते सभेला हजर असल्याचे दाखवण्यात आले. तसा उल्लेख प्रोसेडिंगमध्ये करून सभेत नवीन कार्यकारिणी गठीत केली होती. याप्रकरणी अर्जुन लटकन पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून 2012 मध्ये औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुलाबराव पाटलांसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.