देऊळघाट आणि दहिद येथील पाणीप्रश्न पेटला
देऊळघाटला पर्यायी स्वतंत्र व्यवस्था करण्याची दहिद वासियांची मागणी
बुलडाणा, दि. 02 - देऊळघाट आणि दहिद येथील पाणीवाटपाच्या संदर्भात दोन्ही गावांच्या भावना तिव्र असून गेल्या 15-20 वर्षापासून हा वाद धुमसत आहे. आज बुलडाणा विधानसभा क्षेत्राचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पं.स.च्या आवारात दोन्ही गावच्या गावकर्यांची संयुक्त बैठक घेवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.ग्रा.प.देऊळघाट पदाधिकारी व ग्रामस्थांची तसेच प्रशासनाने दहिद बु. धरणावून देऊळघाट गावाला पाणीपुरवठा करण्याचा आग्रह न धरता त्यांची पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी दहिद ग्रामस्थाांनी केली आहे. आज या बाबत तडजोड करण्यासाठी आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी पं.स.च्या आवारात दोन्ही गावाच्या पदाधिकार्यांना बोलावून समेट घडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी दहिद आणि देऊळघाट या दोन्ही गावाचे ग्रामस्थ हजर होते. तसेच तहसिलदार बाजड, बिडीओ लोखंडे सह संबंधीत अधिकार्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर दहिद वासियांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, मौजे दहिद बु. येथील धरण 100 टक्के कोरडे पडलेले आहे. पाण्याची भुजलपातळी वाढावी याकरिता लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. सध्या दहिद बु.गावालाच अत्यंत तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या देऊळघाट वासियांसाठी टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. देऊळघाट येथील पाणीसमस्या कायम स्वरुपी निवारण्याकरिता मासरुळ येथील धरणातून सहागाव पाणीपुरवठा योजना मंजूर असून पैकी काही काम पुर्ण झाले आहे व पुढील कामासाठी वाढीव सुधारित प्रस्ताव जिवन प्राधीकरण, बुलडाणा यांनी शासनाकडे पाठविलेला आहे.
सद्यस्थितीत दहिद बु. गावालाच पिण्याचे पाणी पुरत नसल्याकारणाने ग्रा.प.पदाधिकारी, ग्रामस्थ देऊळघाट, तसेच जिल्हा प्रशासनाने दहिद बु.धरणावरून देऊळघाटला पाणी नेण्यासाठी आग्रह न धरता त्यांनी पर्यायी व्यवस्था करावी. तसे न केल्यास पिण्याच्या पाण्यासाठी दहिद बु.गावालाच पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने धरण 100% कोरडे पडले असल्याकारणाने प्रशासनाने, देऊळघाट वासियांनी दहिद बु.गावावरुन/धरणावरुन आम्हाला पाणीपुरवठा करावा असा आग्रह न धरता त्यांनी त्यांची पर्यायी व्यवस्था करावी तसेचपाणी नेण्यासाठी धाक दपटशा, रास्तारोको, सार्वजनिक जनजीवन विस्कळीत न करता आपल्या गावाची पाणी समस्या कायमस्वरुपी निवारण्याकरिता आपल्या स्थानिक पं.स., जि.प., विधानसभा मतदारसंघ, लोकसभा मतदार संघ प्रतिनिधींमार्फत शासन स्तरावरुन लोकशाही मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी सरपंच सौ.अमिना बरडे, उपसरपंच विलास राऊत, सदस्य ज्ञानदेव, संजय दांडगे, रविंद्र राऊत, नितीन राऊत, राजेंद्र गायकवाड, भगवान गायकवाड, उमेश वरपे, ज्ञानेश्वर राऊत, विठ्ठल साबळे, गणेश वाघमारे, विनोद राऊत, समाधान राऊत, रामदास देवकर, संजय राऊत, यांचे सह आदिंनी केली आहे.
