Breaking News

जिल्हा केंद्रीय बँकेच्या कामकाजास सुरुवात

तीन दिवसात नवीन पिककर्ज वाटप; कराचा भरणा केल्यास शुन्य टक्के दराने पिककर्ज

बुलडाणा दि. 02 - जिल्हा केंद्रीय बँकेस रिझर्व बँकाने परवाना मिळाल्याने बँकेचे कामकाज आता दैनंदिन सुरु झाले आहे. जिल्ह्यातील  सर्वच शाखा नियमित सुरु झाल्या असून शेतकर्‍यांना शुन्य टक्के व्याजदराने पिककर्ज वाटप सुुरु करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. यामुळे शेतकरी वर्गाला चांगलाच दिलासा मिळाला असून शेतकर्‍यांची बँक म्हणून गणणा होत असलेल्या जिल्हा बँकेची गाडी उशिरा का होईना रुळावर आल्याने जिल्हावासियांच्या मनात आनंदाची भावना आहे.
      प्रशासनाने जिल्हावासियांना आनंदाची वार्ता देत जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे कामकाज उद्या 1 जून 2016 रोजी पासून प्रारंभ केले आहे. अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेला शासनाने रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळवून देत बँक सुरू करण्यास मोलाचा वाटा उचलला आहे. बँक सुरू होताच पीक कर्ज वाटपाची गाडीही सुसाट पळणार आहे. त्यामुळे पिक कर्ज वाटपाची जिल्ह्याची टक्केवारी निश्‍चितच वाढणार आहे. प्रशासक तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी नियमितपणे सातत्य ठेवून बॅक सुरू करण्यास मोलाची भूमिका बजाविली आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकार, नाबार्डच्या सहकार्यामुळे बँकेस 13 मे 2016 रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी बँकिंग परवाना दिला. त्यानंतर बँक सुरू होण्याच्या हालचाली वाढल्या. जिल्हा बँक आता पूर्ववत सुरू होत असल्यामुळे वसूली, ठेवीबाबत नागरिकांनी आतापर्यंत जे सहकार्य दिले ते यापुढेही अपेक्षीत राहणार आहे. जे कर्जदार शेतकरी आपल्याकडील थकीत कर्जाचा भरणा करतील त्यांना त्वरित तीन दिवसाचे आत नवीन पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी थकीत कर्जाचा भरणा केल्यास थकीत व्याजदर द.सा.द.शे 12 टक्के ऐवजी नवीन पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा देण्याच्या उद्देशाने बँकेने कार्यालयीन कामकाजाची वेळ 11 ते 6 ऐवजी सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत ठेवली आहे. तसेच आर्थिक व्यवहार करण्याचे वेळेत सुद्धा वाढ केलेली आहे. बँकेचे आर्थिक व्यवहार सोमवार ते शनिवार सुटीचे दिवस वगळून सर्व शाखा सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुपारी 2.30 ते 4.30 पर्यंत, शहर शाखा सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत आणि सायं 5 ते 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. बँकेने कर्जवाटप, कर्ज वसुली व ठेवी परत करणेबाबत धोरण ठरविले असून त्यानुसार प्रत्येक ठेवीदारांना त्यांचे पैसे बँक धोरणानुसार परत मिळणार आहे.
सर्व कर्जदार तथा ठेवीदार सभासदांनी याबाबत नोंद घेवून बदललेले वेळेनुसार शाखा तथा मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासक तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले आहे.