Breaking News

भारत ‘एनएसजी’ साठी प्रयत्नशील

नवी दिल्ली, दि. 04 - पुढील आठवड्यात अमेरिकेसह अन्य देशांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा करणार असून मात्र, त्यांच्या या दौ-यापूर्वीच भारताने अण्वस्त्र पुरवठादार देशांच्या गटात सामिल होण्यासाठी म्हणजेच सदस्यत्व मिळविण्यासाठी अर्ज सादर केला आहे. त्यासाठी भारताला अमेरिकेचा पाठिंबा हवा असून मोदी अमेरिका दौ-यात यासंबंधी पाठपुरावा करू शकतात. पंतप्रधान मोदी यांचा आजपासून विदेश दौरा सुरु झाला आहे.
एनएसजीची महत्त्वपूर्ण बैठक व्हिएन्ना येथे 9 आणि 10 जून रोजी होणार आहे. या दिवशी एनएसजी टेक्निकलची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. भारताने या अगोदरच सदस्यत्वासाठी 12 मे रोजी एक अर्ज दिला आहे. त्यावेळी पाकिस्तान आणि चीनने याला विरोध केला होता. त्यानंतर आणखी एकदा भारताने अर्ज दाखल केला.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एनएसजीसाठी अर्ज करायलाच तब्बल सात वर्षांचा कालावधी लागला. एका वरिष्ठ राजदुताने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी एनएसजी सदस्यत्वासाठी 48 देशांबरोबर बोलणी करीत आहेत. याचा वेळोवेळी पाठपुरावा करूनही केवळ अर्ज दाखल करण्यासाठी 7 वर्षांचा कालावधी लागला. यासाठी एनएसजीसह फोरमच्या अन्य सदस्यांसोबत चर्चाही झाली आहे. एनएसजीच्या मुद्यावरून एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. भारताने यासाठी आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र ऊर्जा एजन्सीला दस्तावेज सादर केले होते. त्याचाच विचार करून भारताने एनएसजीच्या दृष्टीने आपल्या नियमावलीत बदल करून घेतले आहेत आणि त्यानंतर भारताने अर्ज सादर केला.एनएसजीमध्ये भारताच्या समावेशास चीनने विरोध केला आहे. त्यासाठी पाकिस्तानही चीनला साथ देत आहे.