Breaking News

सोन्याची तस्करी करणा-या 8 जणांना अटक

नवी दिल्ली, दि. 02 - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिका-यांनी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी करणा-या 8 जणांना अटक केली असून यात 4 अफगाणी नागरिक, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो व्यवहार हाताळणारा एक अधिकारी आणि इतर तिघांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय सेवा देणा-या विमानांतील कर्मचारी आणि विमानतळावरील कर्मचा-यांचा समावेश असलेल्या सोन्याच्या तस्करांच्या मोठ्या रॅकेटचा छडा लावल्याचा दावा संचालनालयाने या 8 तस्करांच्या अटकेनंतर केला आहे. काबूलहुन येणा-या अफगाणी एअर लाईन्सच्या विमानातील काही कर्मचारी विदेशी बनावटीच्या सोन्याची भारतात तस्करी करीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर संचालनालयाच्या अधिका-यांनी सापळा रचला आणि प्रत्येकी 13 किलो वजनाच्या सोन्याच्या 4 विटा ताब्यात घेतल्या. या विटांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 3.5 कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती संचालनालयाच्या दिल्ली विभागाचे सहसंचालक आर. के. दिग्विजय यांनी दिली. अफगाणच्या कॅम एअर लाईन्सचा फ्लाईट इंजिनीअर, विमानतळावरील 2 कर्मचारी आणि अन्य 5 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
अफगाणी एअर लाईन्सच्या इंजिनीअरने स्वत:सोबत सोने आणायचे आणि दिल्लीत आल्यानंतर तेथील कर्मचा-यांना विमानातच ते द्यायचे. त्यानंतर या कर्मचा-यांनी ते सोने आपल्या बुटांमध्ये लपवून कर्मचा-यांसाठी असलेल्या प्रवेश द्वारातून ते बाहेर न्यायचे व सिंडिकेटच्या अन्य सदस्यांच्या स्वाधीन करायचे.