Breaking News

देशात पुन्हा सुरु होणार पाणबुड्यांची निर्मिती : मनोहर पर्रिकर

मुंबई, दि. 29 -  पुन्हा एकदा भारताने स्वदेशात पाणबुडी निर्मितीला सुरूवात केली असून केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी माझगाव गोदीतील पाणबुडी बांधणी केंद्राचे लोकार्पण केले. 1993 नंतर भारतात पाणबुडीनिर्मिती थांबली आहे. पाणबुडयांची निर्मिती क्षमता असूनही थांबणे योग्य नाही, असे मत त्यांनी यावेळी नोंदवले. तसेच यापुढे पाणबुडीनिर्मिती संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान वापरून करण्यावर सर्वाधिक भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माझगाव येथील जहाजबांधणी केंद्रातील उत्पादन अंदाजे वार्षिक 40 टक्क्यांनी वाढले असून 2013-14 मध्ये हे उत्पादन 2 हजार 865 कोटी होते. ते 2015-16 या आर्थिक वर्षांत तब्बल 4 हजार 9 कोटी इतके वाढले आहे, असे सांगत यापुढील काळात देशात नव्या तंत्रज्ञानासह संरक्षण निर्मिती क्षेत्रात मोठे प्रकल्प उभारले जाणार असल्याचेही पर्रिकर यांनी सुतोवाच केले. माझगाव डॉक आधुनिक प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेले हे पाणबुडी बांधणी केंद्र अत्याधुनिक सुविधा व तंत्रज्ञानाने युक्त आहे. बर्‍याच काळानंतर भारतीय नौदलासाठी अशा पाणबुडीबांधणी केंद्राची निर्मिती या निमित्ताने झाली आहे. या केंद्रामुळे अल्पावधीतच भारतासाठी पाणबुडयांची निर्मिती पुढील काळात शक्य झाली असून भारतीय नौदल व किनारारक्षक दलाच्या गरजा आता भारतातच पूर्ण होणार आहेत.