Breaking News

आयपीएल : अंतिम सामना आज

बेंगळुरू, 29 -  प्रेरणादायी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज  रविवारी आयपीएल-9 च्या विजेत्यांचा फैसला होणार आहे. बेंगळुरू तिसर्‍यांदा फायनलमध्ये पोहोचला, हे विशेष. उभय संघांची नजर पहिल्या आयपीएल  जेतेपदावर असेल.बेंगळुरूकडे दोनदा (2009 आणि 2011) अंतिम सामना खेळण्याचा अनुभव असल्याने, हैदराबादवर त्यांचे पारडे थोडे जड वाटते. सनरायजर्सने  2013 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत प्ले ऑफमध्ये धडक दिली होती. बेंगळुरूची कामगिरी अनियमित राहिल्याने प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना अखेरचे  चारही सामने जिंकणे गरजेचे होते. हे चारही सामने जिंकूनहा संघ तिसर्‍यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे हा संघ आज अंतिम सामन्यातही विजयी  निर्धाराने खेळून बाजी मारण्याच्या इराद्यात असेल.
बेंगळुरूकडे कोहलीशिवाय एबी डिव्हिलियर्स हे प्रतिभावान फलंदाज आहेत. कोहलीने 15 सामन्यांत 919 धावा केल्या असून त्यात चार शतके आणि सहा  अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च खेळी 113 धावांची होती. डिव्हिलियर्सच्या 682 धावा असून, त्यात एक शतक तसेच सहा अर्धशतकांचा समावेश आहे.  क्वालिफायरमध्ये चिन्नास्वामीवर बेंगळुरूने 29 धावांत 5 गडी गमविल्यानंतरही डिव्हिलियर्सने नाबाद 79 धावा ठोकून संघाला अंतिम फेरी गाठून दिली. या  दोघांपाठोपाठ ख्रिस गेल याच्या कामगिरीकडेही नजर असेल. गोलंदाजीत यजुवेंद्र चहल हा संघाचा ‘हुकमी एक्का’ सिद्ध झाला. त्याने 12 सामन्यांत 20 गडी बाद  केले. ख्रिस जॉर्डन हा अखेरच्या षटकात प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. शेन वॉटसन हा आणखी एक चांगला गोलंदाज आहे. त्याचे  15 सामन्यांत 20 बळी आहेत.
मागच्या सामन्यात सनरायझर्स संघाने बेंगळुरूवर 15 धावांनी विजय नोंदविला होता. सनरायझर्सची भिस्त कर्णधार डेव्हिड वॉर्नर याच्या फलंदाजीवर असेल. त्याने  एकाकी झुंज देत संघाला प्रथमच अंतिम फेरीच पोहोचविले. सनरायझर्स दोन मोठ्या विजयासह अंतिम फेरीत दाखल झाला आहे. दोनवेळेचा चॅम्पियन  कोलकाताला एलिमिनेटरमध्ये 22 धावांनी आणि त्यानंतर दुसर्‍या क्वालिफायरमध्ये गुजरातला चार गड्यांंनी नमविले होते. वॉर्नरने 16 सामन्यात आठ  अर्धशतकांसह 779 धावा केल्या असून सर्वाधिक धावा काढणार्‍या खेळाडूंत कोहलीपाठोपाठ तो दुसर्‍या स्थानावर आहे. गुजरातविरुद्ध वॉर्नरने सर्वाधिक नाबाद  93 धावा ठोकल्या हे विशेष. त्याच्यासोबत शिखर धवन (473), मोझेस हेन्रिक्स, दीपक हुड्डा, नमन ओझा आणि बिग हिटर ऑल राऊंडर बेन कटिंग हे भक्कम  फलंदाज आहेत. गोलंदाजीतही हा संघ भक्कम आहे. त्यामुळे बेंगळुरूची फलंदाजी विरुद्ध हैदराबादची गोलंदाजी असाच हा सामना असेल.