...तर मुख्यमंत्र्यांच्या बदनामी षडयंत्राला मिळणार बळ!
साबां मंत्र्यांना बदल्यांचे अधिकार; आर्थिक गैरव्यवहाराला बळ देणारे परिपत्रक
मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 30 - साबांचे कार्यकारी अभियंता पर्यंतच्या बदल्या साबांमंत्र्यांनी कराव्यात हे 27 मे रोजी प्रसिध्द झालेले परिपत्रक सरकार आणि मुख्यमंत्र्यांसाठी धोकादायक असून देवेंद्र फडणवीस यांच्या बदनामी षडयंत्राला आणखी बळ देईल अशी भिती साबांत व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्राच्या प्रशासनात सार्वजनिक बांधकाम खाते हे सर्वाधिक बदनाम खाते म्हणून परिचित आहे. विशेषतः ईडीग्रस्त छगन भुजबळ यांनी साबांत केलेला खुला हस्तक्षेप साबांची प्रतिमा धुळीस मिळवून गेला असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा तिच चुक केल्याची टिकात्मक प्रतिक्रिया 27 मे रोजी जारी झालेल्या परिपत्रकानंतर व्यक्त होऊ लागली आहे. प्रशासकीय बदल्यांचे अधिकार संबंधित विभागाच्या मंत्र्यांना असले तरी बदली प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी शिक्का मोर्तब केल्याशिवाय बदलीचा अंतिम आदेश पारित होत नाही ही आजवरची कार्यपरंपरा आहे. तथापि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 27 मे रोजी एक परिपत्रक जारी केले असून या परिपत्रकानुसार साबांतील कार्यकारी अभियंता या पदापर्यंतच्या बदल्या करण्याचे अधिकार साबां मंत्र्यांना प्रदान करण्यात आले आहेत. अधिकारांचे विकेंद्रीकरण करून विकासाच्या प्रक्रियेला वेग देण्याचा उदात्त हेतू या निर्णयामागे असला तरी हाच उदात्त हेतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आणखी मलीन करण्यास कारणीभूत ठरेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात साबां मंत्रालयाने केलेला वाढता हस्तक्षेप भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराला कारणीभूत ठरला. हा इतिहास ताजा असतानाही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा साबां मंत्रालयाला हस्तक्षेप करण्यासाठी परवानगी देणारे परिपत्रक काढल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या परिपत्रकामुळे साबांतील भ्रष्ट, मुजोर, जातीयवादी अभियंते साबांला वेठीस ध़रतील आर्थिक देवाणघेवाणीला बळ मिळेल यातून हितसंबंध जपण्यास प्राधान्य मिळेल. साबांतील अंतर्गत कलह आणखी वाढेल. वास्तविक साबांत कार्यरत असलेले मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधिक्षक अभियंता किशोर पाटील, पी.के. पाटील या भुजबळ लॉबीने अवघे प्रशासन वेठीस धरले आहे. साबां सचिव आणि मुख्यमंत्र्यांची उघड बदनामी करणारी मोहीम त्यांनी राबविली आहे. नव्या परिपत्रकामुळे या मोहिमेला आणखी बळ मिळेल आणि हे परिपत्रक कुर्हाडीच्या दांड्या प्रमाणे गोतास काळ ठरेल. म्हणून मुख्यमंत्र्यांनी परिपत्रकाचा फेरविचार करावा अशी मागणी साबांतूनच केली जात आहे.
औरंगाबाद सा.बा. मंडळात सावळा गोंधळ
सार्वजनिक बांधकाम औरगांबाद विभागातील फुंलब्रीचे ए.बी. सुर्यवंशी, अधीक्षक अभियंता यांनी भ्र्रष्टाचाराचा कळस गाठला असून, नियम धाब्यावर बसवून सर्व्हेच्या अंतर्गत 3 कोटींचे बीले तयार केली असून, तब्बल 45 लाखांची बीले देयके काढण्यासाठी विभागाला सादर केली आहेत. मजूर सोसायट्या या अनस्कील्ड मध्ये येत असल्यामुळे सर्व्हेचे काम मजुर सोसायटयांना देता येत नाही, तरही उपविभागाने बीले अदा करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तर औरंगाबाद मंडळाचे अधीक्षक अभियंता ए.बी. सूर्यवंशी यांच्या इशार्यावर वृषाली गाडेकर, कार्यकारी अभियंता सा.बा विभाग औरगांबाद, यांनी प्लॅन व नॉनप्लॅनची तब्बल 90 कोटीचें (लेखाशीर्ष 5054/03- 5054/04) नाबार्ड व रस्त्यांची डागडुजी करणे (खड्डे भरण्याची) देयके मार्चअखेर पर्यंत अदा केली तर, श्री शेंडे यांनी सा.बा. पश्चिम विभाग औरगांबाद या विभागातून प्लॅन व नॉनप्लॅनची 50 कोटीचे बील अदा केली आहेत. या सर्व गौडबंगालचा पर्दाफाश करणारी सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर नलावडे यांची सविस्तर मुलाखत उद्याच्या अंकात.
पुरोगामी द्वेषी किशोर पाटीलवर सरकार मेहेरबान!
महाराष्ट्राचे पुरोगामीत्व कायम ठेवण्याची भाषा करणारे सरकार पुरोगामी महापुरूषांच्या तैलचित्रांचा अवमान करणारे किशोर पाटील यांच्यावर मेहेरबान का असा सवाल विचारला जात आहे. कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांनी आपल्या मुंबई रस्ते विकास संकल्प चित्र विभागाच्या कार्यालयात सर्वच महापुरूषांसह लोकमान्य टिळक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तैलचित्र लावण्याऐवजी ते अडगळीत टाकल्याची तक्रार होत असतांना त्यांच्याविरूध्द सरकारपातळीवर कुठलीच कारवाई होत नाही. इतकेच नाही तर महापुरूषांच्या नावावर मतांची भीक मागणारेही मुग गिळून आहेत यावर आश्चर्य व्यक्त होते आहे.
किशोर पाटील यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा : अशोक सोनवणे
सार्वजनिक बांधकाम विभागातील मुंबई रस्ते विकास संकल्प चित्र विभागाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यासह विविध महापुरूपांच्या प्रतिमेंना अडगळीचा रस्ता दाखविल्यामुळे कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी केली आहे.
ईडीने त्या 40 कोटीचा हिशेब घ्यावा
कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांनी तत्कालीन साबांमंत्री छगन भुजबळ यांना कोट्यवधी रूपये दिल्याची चर्चा आहे. 120 कोटीच्या देयकांच्या मोबदल्यात टक्केवारी म्हणून 40 कोटी रूपये किशोर पाटील यांनी भुजबळ यांच्या परिवारातील एका सदस्याला दिले या घटनेस प्रत्यक्ष साक्षीदारही आहेत. भुजबळ यांची चौकशी करणार्या ईडीने किशोर पाटील यांनाही ताब्यात घेऊन त्या 40 कोटीसह अन्य व्यवहाराचा हिशेब घ्यावा अशी मागणीही साबांतून होत आहे.