Breaking News

देशासही राज्यातही उष्णतेची लाट

पुणे, दि. 17 -  पुण्यात सलग दुसर्‍या दिवशी कमाल तापमानाने चाळिशी गाठली. राज्यात मालेगाव, भिरा, बुलडाणा येथे उष्णतेची लाट आली असून, सर्वाधिक तापमान मालेगाव येथे 44. 8 अंश सेल्सिअसची नोंद झाली. 

पुण्यात 10 एप्रिलपासून सातत्याने तापमान वाढत आहे. शहरातील कमाल तापमानाचा पारा पुढील दोन दिवसांमध्ये 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. रविवारी विदर्भात उष्णतेच्या तीव्र लाट येणार असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी दिवसाच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत 3 ते 5 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे.
पुण्यासह नगर आणि नाशिक येथील किमान तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानाची दरी वाढली आहे. पुण्याचे कमाल तापमान सरासरीपेक्षा वाढून 40.2 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 1.1 अंश सेल्सिअसने कमी होऊन 18.6 इतके झाले.