युतीचे सरकार आल्यापासून सिंचनात एक टक्काही वाढ नाही
शरद पवार यांची खंत
जळगाव, दि. 17 - राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर दीड वर्षात एक टक्काही सिंचन झाले नाही ही चिंतनीय बाब आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. एका वृत्तपत्रातील बातमीचा आधार त्यांनी या वेळी दिला. व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी त्याला दुजोरा दिला, तर जलसंपदामंत्र्यांनी मात्र मौन बाळगले.जळगाव येथील जैन हिल्स येथे तीन दिवसीय डाळिंब परिषदेच्या उद्घाटनासाठी श्री. पवार येथे आले असता त्यांनी हे मत व्यक्त केले.
पवार म्हणाले की, आपण कोणत्याही समारंभाच्या भाषणात कोणावरही टीका करीत नाही. परंतु राज्यात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. अशातच राज्यात मोठे विदारक चित्र समोर आले आहे. गेल्या दीड वर्षात राज्यात एक टक्काही सिंचन झाले नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. व्यासपीठावर असलेले शासनातील मंत्री खडसे व महाजन यांना काय हे खरे आहे काय? अशी विचारणा केली. त्या वेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कोणतेही मत व्यक्त न करता मान हलवून कबुली दिली. मात्र, जलसंपदामंत्री महाजन यांनी मात्र मौन बाळगले. त्यानंतर बोलताना पवार म्हणाले की, जर खरंच असं असेल, तर ही अतिशय गंभीर बाब आहे.
