Breaking News

टंचाईच्या तडाख्यात जिल्हा होरपळला

सांगली, 27 - उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालल्याने तापमानात मोठी वाढ होत असतानाच आता टंचाईच्या झळाही वाढण्यास सुरुवात झाली आहे. तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत पोहोचला असल्याने ग्रामीण भागात याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षीपासून टंचाईच्या झळा सोसणार्‍या जिल्ह्यात आता 106 ठिकाणी टँकर सुरु झाले असून, रोजगार हमीच्या कामावर साडेपाच हजार मजूर कार्यरत आहेत.
यंदाच्या हिवाळ्यापासूनच जिल्ह्यात टंचाई परिस्थिती अनुभवण्यास येत होती. त्यामुळे जिल्ह्यातील जत आणि तासगाव तालुक्यातील काही गावात दोन महिन्यांपासूनच टँकर सुरु झाले आहेत. आता यात वाढ झाली असून, साडेपाचशेहून अधिक वाड्यावस्त्यांनाही टँकरवर आपली तहान भागवावी लागत आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या म्हैसाळ, टेंभूसह इतर पाणी योजनांचे आवर्तन सुरु असल्याने टंचाई परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी त्याची मदत होत आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईच्या झळा जत तालुक्याला सोसाव्या लागत असून, या ठिकाणी पाणी, रोजगार आणि जनावरांना चारा अशा तिहेरी संकटात या तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. सध्या या भागात कर्नाटकातून चार्‍याची आवक होत असली तरी त्याच्या जादा दराने शेतकर्‍यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. जत तालुक्यात सर्वाधिक पाण्याचे टँकर सुरु असून, म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा लाभ होणार्‍या क्षेत्र वगळता जत तालुक्यात टंचाई परिस्थिती गंभीर बनली आहे.जिल्ह्याच्या पूर्वभागात चाराटंचाई निर्माण झाली असून, कर्नाटकातून चारा आणावा लागत आहे. गेल्या तीन वर्षापासून खरीप व रब्बी हंगामाने शेतकर्‍यांना दगा दिल्याने चार्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. या पार्श्‍वभूमीवर चारा डेपो सुरु करण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतंर्गंत 384 कामे सुरु असून, त्यावर 5 हजार 330 मजूर काम करत आहेत. यात सर्वाधिक 2403 मजूर जत तालुक्यात कामावर आहेत. शासनाच्या विविध विभागामार्फत विहीर खुदाई, विहीर पुनर्भरण, गाळ काढणे, फळबाग लागवड, शेततळे, रोपवाटिका, माती नाला बांध आदी कामे सुरु आहेत. या कामात भविष्यात वाढ होऊ शकते.