पलूसमध्ये तरुणाचा खून
पलूस, 27 - काल रात्री उशिरा येथे झालेल्या तरुणाच्या खुनातील संशयिताला अवघ्या चौदा तासांत पोलिसांनी गजाआड केले. त्याने गुन्ह्यात वापरलेले जर्मन बनावटीचे रिव्हॉलव्हरही त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केले. अमर शिवराम गायकवाड (वय 37, रा. वाळवा, सध्या पलूस) असे त्याचे नाव आहे. त्याने आर्थिक देवाणघेवाणीतून नवीन बसस्थानकाजवळ सावंतपूर (ता. पलूस) येथील किशोर मधुकर सदामते (वय 22) याचा गोळ्या झाडून खून केला होता. खुनानंतर तो दुचाकीवरून पळून गेला होता. काही दिवसांपूर्वी किशोरने अमरच्या होंडा सिटी मोटारीचा अपघात करून नुकसान केले होते. ते भरून देत नसल्याने त्यांच्यात रात्री वाद व झटापट झाली. अमरने पिस्तुलातून किशोरला छातीत जवळून गोळी मारली. त्यात किशोर जागीच ठार झाला. किशोरचा भाऊ किरण मधुकर सदामतेने पलूस पोलिस ठाण्यात अमर गायकवाड (सरकार) वर संशय व्यक्त करून त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
घटनेबाबत पोलिसांनी सांगितले, की किशोर सदामते हा फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करीत होता. त्याचे पलूसमध्ये येणे-जाणे होते. अमरही चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्यातूनच दोघांची ओळख व पुढे मैत्रीही झाली. दोघे एकमेकांशी आर्थिक व्यवहार करीत होते. एकमेकांची वाहनेही वापरत. काही दिवसांपूर्वीच किशोरने अमरची मोटार पलूसच्या नवीन बसस्थानकाजवळील प्रवेशद्वाराजवळ धडकवली होती. अमर त्याची भरपाई मागत होता. मात्र किशोर ती देत नव्हता. यातून त्यांच्यात वाद सूरू झाला.
काल रात्री पावणेअकराच्या सूमारास किशोर सावंतपूर येथील शेजारच्या शाळकरी मुलाला घेऊन पलूसमध्ये शीतपेय पिण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याची अमरबरोबर बाचाबाची झाली. नंतर त्यांच्यात मारामारीही झाली. अमरने रिव्हॉलव्हरने किशोरच्या छातीत गोळी झाडली. नंतर मोटारसायकलवरून पळून गेला. किशोरबरोबर आलेल्या मुलाने त्याच्या घरी तत्काळ या घटनेची माहिती दिली. नातेवाईक व मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसही लगेच आले. तणाव वाढू नये यासाठी कुंडल, भिलवडी, तासगाव येथून फौजफाटा मागवला. नाकेबंदीही केली होती. जिल्हा पोलिसप्रमुख सुनील फुलारी, पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पहाटे तीनपर्यंत पंचनामा व साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. अमरला पकडण्यासाठी पथके रवाना झाली. अमर गुन्हेगारी वृत्तीचा आहे. तासगाव पोलिस ठाण्यात त्याच्यावर मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. धुळगाव (ता. तासगाव) हे त्याचे मूळगाव आहे. वाळवा येथे त्याचे दीर्घकाळ वास्तव्य होते. मोबाईल लोकेशवरून तो ताकारी परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. बनेवाडी फाटा (ता. वाळवा) येथे तो येणार असल्याचे समजल्याने उपाधीक्षक श्री. पिंगळे यांनी सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार अमर जाळ्यात सापडला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणल्यावर त्याने जर्मन बनावटीच्या (किंमत सुमारे 2 लाख 75 हजार) रिव्हॉलव्हरने किशोरचा खून केल्याचे कबूल केले. रिव्हॉलव्हरही पलूस येथील जवाहर नवोदय विद्यालयामागील शेतात पुरून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तेही ताब्यात घेतले आहे. पोलिस उपाधीक्षक श्री. पिंगळे, भिलवडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मोरे, पलूसचे सहायक पोलिस निरीक्षक जे. वाय. पाटील, कुंडलचे सहायक पोलिस निरीक्षक बी. डी. ढेरे व पलूसचे पोलिस कारवाईत सहभागी होते. सहायक पोलिस निरीक्षक जे. वाय. पाटील तपास करीत आहेत.