भाजयुमोच्या गणेश पांडेची भाजपमधून हकालपट्टी
मुंबई, 28 - सहकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजयुमोच्या शहराध्यक्षाला राजीनामा द्यावा लागला आहे. पीडित तरुणीने भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केल्यानंतर ही कारवाई झाली.
‘मुंबई मिरर’ या वृत्तपत्रात हे पत्र छापून आले आहे. मला राजकीय षडयंत्रात गोवले गेल्याचा दावा गणेश पांडे यांनी केला आहे.
गणेश पांडे या भाजयुमोच्या मुंबई शहराध्यक्षाने मथुरेत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान आपला विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. भाजयुमोच्या एका परिषदेनिमित्त देशभरातले कार्यकर्ते मथुरेतल्या एका हॉटेलात उतरले होते. तेव्हा ही घटना घडल्याचे पीडितेने सांगितले. 4 मार्चच्या रात्री पांडेने वारंवार फोन करुन, मेसेज करुन मला आपल्या रुमवर बोलावले आणि तिथे गेल्यावर अश्लील वर्तन केले, असा आरोप तिने केला आहे. इतकेच नव्हे तर ती तिथून निघालो असता त्याने हात पकडण्याचाही प्रयत्न केल्याचे तिने म्हटले आहे.
प्रति,
माननीय आमदार,
श्री. आशिष शेलार
मथुरेतल्या कार्यक्रमासाठी डान्सची प्रॅक्टिस सुरु असताना गणेश पांडेने मला बोलवण्यासाठी माणसे धाडली. मी नकार दिला असता ते मला जबरदस्तीने गणेश पांडेच्या रुमवर घेऊन गेले. गणेश पांडे मद्यपान करत होता. तिथे त्याने माझ्याशी अश्लिल भाषेत संभाषण सुरु केले. मी माझ्या रुमकडे निघाले असता गणेश पांडेने माझा हात पकडला. मात्र, मी त्याचा हात पिरगळून त्याला म्हटले, गणेशजी ऐसी फिजिकल मस्ती नहीं करना कभी.
पीडित महिला