Breaking News

पोलिस पत्नीचे दागिने लांबविणारा काही तासातच गजाआड

अहमदनगर । प्रतिनिधी । 05 - पोलिस कर्मचारी संजिव पाटोळे यांच्या पत्नी सौ. संगिता पाटोळे या मुलांना शाळेत सोडून पुन्हा घरी येत असताना मोटारसायकलवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पन्डेलला हिसका मारून चोरुन नेले. ही घटना गुरुवार (दि. 3) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर चोरटा पसार झाला. या घटनेची माहिती समजताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी चोरट्याच्या वर्णनावरुन त्याचा शोध घेवून काही तासातच त्याला जेरबंद केले. हनुमंत येलू शिंदे (रा. लेखानगर, पाईपलाईनरोड, अहमदनगर) असे चोरट्याचे नाव आहे. 
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, पोलिस कर्मचारी संजीव पाटोळे यांच्या पत्नी सौ. संगिता पाटोळे या सावेडी येथील ऑक्झिलियम शाळेत मुलांना सोडविण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना सोडविल्यानंतर त्या पुन्हा घराकडे येत असताना पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यात असलेले सोन्याचे पिन्डल हिसका मारून चोरुन नेले. घटनेची माहिती मिळताच काही वेळातच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच अप्पर पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनीही घटनास्थळी भेट देवून तपासाच्या सुचना दिल्या. साक्षीदारांनी सांगितलेल्या चोरट्याच्या वर्णनावरुन पोलिसांनी लेखानगर येथे राहणार्‍या हनुमंत शिंदे या चोरट्याला त्याच्या राहत्या घरी अटक केली. सुरुवातीला 
उडवा उडवीची उत्तरे देणार्‍या चोरट्याने पोलिसी खाक्या दाखविताच चोरीची कबूली देवून मुद्देमाल परत केला. याबाबत सौ. संगिता पाटोळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसात जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
काही तासातच आरोपी गजाआड झाला. सावेडी उपनगरात चैन स्नॅचींगच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी साधे वेशात गस्त वाढवावी अशी मागणी नागरीकांकडून होत आहे. विशेष म्हणजे अनेक गुन्हे घडूनही पोलिसांना आरोपी मिळून येत नाही. मात्र पोलिस कर्मचार्‍यांच्या पत्नीच्या गळ्यातील दागिने पळवताच पोलिसदल खडबडून जागे झाले आणि आरोपी जेरबंद केला. अशीच तत्परता पोलिसांनी सर्वसामान्य नागरीकांच्या बाबतीतही दाखवावी, अशी मागणी नागरीकांमधून दबक्या आवाजात येत आहे. हनुमंत शिंदे याच्याकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. या तपास कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शशिराज पाटोळे, पो.स.ई. सोनी, पो.हे. का. गायकवाड, हिंगडे, पवार, गोमसाळे यांनी परिश्रम घेतले.