Breaking News

6 मार्चला शिर्डीत राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण

अहमदनगर । प्रतिनिधी । 05 - मराठा आरक्षण जनआंदोलनासाठी येत्या 6 मार्चला शिर्डीत राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी दिली. 
याबाबत बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजास आरक्षण मिळावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाबाबत मराठा समाजात अंतर्गत मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदत आहे.काही दिवसांपूर्वी देशातील मराठा समकक्ष शेतकरी जातींपैकी जाट,पटेल,कापू,गुज्जर या समाजांच्या आरक्षण आंदोलनाचा मोठा भडका उडाला होता.महाराष्ट्रातही मराठा आरक्षणासाठी जे विस्कळीत व विखुरलेल्या स्वरूपात प्रयत्न होत आहेत त्यामुळेच आरक्षणाचा गाडा पुढे सरकायला तयार नाही हे वास्तव आता मान्य केले जात आहे.या पार्श्‍वभूमीवर मागील महीन्यात औरंगाबाद येथे आरक्षणवादी विविध मराठा संघटना,व्यक्ती,संस्था,विविध राजकीय पक्षातील मराठा कार्यकर्ते व आरक्षण अभ्यासक यांच्या राज्यस्तरीय दोन बैठका झाल्या.या बैठकांमध्ये झालेल्या निर्णयानुसार येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नोव्हेंबर 2016 मध्ये सर्वांचे मिळून एकाच वेळी एकाच प्रकारचे आंदोलन अर्थात मराठा आरक्षण जनआंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.किमान पंचवीस हजार ठिकाणी आंदोलन करून एक कोटी मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरतील यासाठी नियोजनबद्ध दिर्घकाळ काम करण्याचा निर्णय अनेक संघटना व कार्यकर्त्यांनी घेतला.
मराठा आरक्षण जनआंदोलनाच्या पहील्या टप्प्यात आंदोलन उभे करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणार्या कार्यकर्त्यांची राज्यभरातून निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. शिबीरात एकूण चार सत्रात मराठा आरक्षण इतिहास व आरक्षणाची गरज,मराठा आरक्षणाची वैधानिक वैधता व न्यायालयीन लढा आणि मराठा आरक्षण जनआंदोलन या विषयांवर न्यायमूर्ति खत्री राज्य मागासवर्ग आयोगाचे मा.सदस्य तथा समाज कल्याण विभाग मा.सहसंचालक प्रल्हादराव शितोळे,मराठा आरक्षण चळवळीतील नेते व प्रख्यात वक्ते प्रविणदादा गायकवाड,आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे पाटील,आरक्षण लढ्यात प्रदिर्घकाळ नेतृत्व करीत असलेले इंजी.संजीव भोर पाटील,संतोषभाऊ गव्हाणो,आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.