मानवतेचा संदेश देणार्या डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याचे राजकारण व्हावे हे दुर्दैव : ना.मुंडे
गंगाखेड/प्रतिनिधी । 27 - जागतिक स्तरावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव केला जात आहे, त्यांची 125 वी जंयती जगभर एका अनोख्या पध्दतीने साजरी करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असतांना, इथे डॉ. आंबेडकरांचे नाव घेऊन अनेक वर्ष राजकारण करणार्यांनीच डाॅ.बाबासाहेब आबेडकरांच्या पुतळ्याचे राजकारण करावे ही दुर्दैवी बाब आहे.
तुम्ही कितीही विरोध करा पण सत्तेत आम्ही आहोत, सत्ते पुढे शहाणपण चालत नाही पुतळा योग्य जागी उभारण्यात आला आहे, असे प्रतिपादन शनिवारी मा.ना.पंकजाताई मुंडे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी केले.
गंगाखेड नगरपरिषदच्यावतीने डॉ.आंबेडकर चौकात उभारण्यात आलेला पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, संत जनाबाई मंदिराचा सभा मंडपाचे लोकार्पण व स्व.गोपीनाथ मुंडे उद्यान प्रवेशद्वाराचा नामकरण सोहळ्याचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.दिलीप कांबळे, पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर, खा.संजय जाधव, मा.आ.विजयराव गव्हाणे, रमेश अप्पा कराड, त्रिंबक गुट्टे, भारत चामे, अभय चाटे, विठ्ठलराव खरडे, गणेश रोकडे, बालाजी देसाई, बाळासाहेब रोकडे, श्रीनिवास मुंडे, व्यंकटराव तांदळे, बाळासाहेब जामगे, आनंद भरोसे, गंगाप्रसाद आणेराव, नगराध्यक्षा सौ.जयश्रीताई मुंडे, सौ.मंजूषा जामगे, सौ.ज्योती ठाठाणी, सौ.मेघना आय्या, न.पा.नगरसेवक सह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांनी केले, तर आभार अॅड.तांदळे यांनी मानले.