Breaking News

जिल्हा परिषद गट, गणांची लवकरच पुनर्रचना

अहमदनगर । प्रतिनिधी । 05 - जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी 2011 ची जनगणना ग्राह्य धरली जाणार असून, त्यानुसार एप्रिल महिन्यात गट व गणांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे. नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत हद्दीतील गट व गण रद्द होणार असल्याने विद्यमान सदस्यांचा जीव टांगणीला लागला आहे. 
जिल्हा परिषदेची पंचवार्षिक निवडणूक दीड वर्षांनी होत आहे. जिल्हा परिषदेची गतवेळची निवडणूक 2001 च्या जनगणनेनुसार झाली. त्यानंतर देशात जनगणनेचे काम झाले. सद्यस्थितीत 2011 च्या जनगणनेतील लोकसंख्या तसेच जातीनिहाय लोकसंख्येचे आकडे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे नव्याने झालेल्या जनगणनेनुसार जिल्हा परिषदा व महापालिकांच्या आगामी निवडणुका घेण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्या उपस्थितीत पुणे येथे बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुका नव्या जनगणनेनुसार घेण्याची सूचना केली आहे. ही सूचना नगर जिल्ह्यासाठीही लागू आहे. 
जिल्हा परिषदेच्या गटांची नव्याने रचना करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया मे महिन्यांत राबविण्यात येणार होती. मात्र ती आता एप्रिलमध्ये सुरू करण्यात येणार आहे. जनगणना आणि नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका, यामुळे जिल्हा परिषदेच्या गटात मोठा बदल होणार आहे. नव्याने कर्जत, अकोले, पारनेर नगरपंचायतीची स्थापना झाली आहे. नेवासा नगरपंचायत जाहीर झाली. त्यामुळे चार शहरांतील गट रद्द होतील. तसेच शेवगाव आणि जामखेड नगरपरिषदेतील गटही संपुष्टात येतील. आहे त्या गटांच्या संख्येतून सहा गट कमी होतील. पण, नव्या जनगणनेमुळे त्यात वाढ होईल. त्यामुळे गट आणि गणांच्या संख्येत फारसा फरक पडणार नाही. पण गटांच्या हद्दीमध्ये बदल होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. नगरपंचायत व नगरपालिका स्थापन झालेल्या गटातील विद्यमान सदस्यांना निवडणुकीसाठी नवीन गटाचा आधार घ्यावा लागणार असल्याचे दिसते.