दुष्काळात जि.प. सदस्यांची केरळ वारी
अहमदनगर । प्रतिनिधी । 05 - जिल्हा परिषदेच्या सदस्यांना केरळ राज्याचा मोह आवरेनासा झालेला आहे. यामुळे दोन विषय समितीच्या सदस्यांनी ऐन दुष्काळात केरळ राज्याचा दौरा करण्याचे नियोजन केले आहे. कृषी समितीचे सभापती, अधिकारी आणि कर्मचारी यांनी गुरूवारी केरळच्या दिशेने टेकऑफही केले आहे. कृषी समितीच्या या कागदी विमान दौर्याबाबत जिल्हा परिषदेत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे.
जिल्हा परिषद सदस्यांसाठी अभ्यास दौर्यांचे नियोजन करण्यात येते. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून खर्च करण्यात येतो. जर अभ्यास दौरा परदेशात असेल, तर त्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक आहे. मात्र, राज्याबाहेर अभ्यास दौरा असेल तर तो जिल्हा परिषद पातळीवर निश्चित करण्यात येतो. मात्र, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य वित्त व लेखाधिकारी यांच्याकडे दौर्यांची फाईल मंजूर करून घेणे आवश्यक आहे.कृषी समितीच्या केरळ दौर्याबाबत जि.प. अध्यक्षा मंजुषा गुंड यांचे कार्यालय अनभिज्ञ आहे. अध्यक्षा गुंड यांच्याकडे कृषीच्या केरळ दौर्याची फाईल मंजुरीसाठी आलेली नाही. केवळ मुख्यालय सोडण्याची परवानगी मागणी पत्र गुंड यांच्या कार्यालयाला पाठवण्यात आलेले आहे. कृषी समितीच्या सदस्यांचा केरळ दौरा वाहनाने की विमानाने याबाबत जिल्हा परिषदेत कोणी खरी माहिती देत नाही. कृषी समितीचे सभापती शरद नवले मोबाईल उचलत नाही. अन्य सदस्यांची तिच अवस्था आहे. अधिकार्यांचे फोन स्विचऑफ असून काही अधिकार्यांनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर कृषीचा कागदोपत्री दौरा वाहनाने दाखवण्यात आला असून प्रत्यक्षात सदस्य विमानाने केरळकडे टेकऑफ झालेले आहेत यास दुजोरा दिला.
6 मार्चला शिक्षण समितीचे सभापती आणि सदस्यही केरळकडे कूच करणार आहेत. सदस्य बाळासाहेब हराळ यांनी दोन समितीचा दौरा बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष गुंड यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी दौर्याबाबत कानावर हात ठेवले.