Breaking News

राणीच्या बागेच्या सफाईसाठी झाडूच नाही

मुंबई, प्रतिनिधी, दि. 05 -  स्वच्छ भारत अभियानांतर्गत जागोजागी परिसर स्वच्छ करण्यात येत असताना भायखळा येथील जिजामाता उद्यानात झाडूच्या कमतरतेमुळे या अभियानाला गालबोट लागल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण, केंद्र व राज्यात भाजपा सरकार असताना, तसेच मुंबई महानगरपालिकेवर राज्य सरकारात सहकारी असलेल्या शिवसेनेची सत्ता असतानाही राणी बागेतील सफाई कामगारांना झाडूसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
पालिकेने अर्थसंकल्पात विकासासाठी कोड्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मात्र, राणीबागेतील सफाई कामगारांना झाडू देण्यासाठी पालिकेकडे पैसे नाहीत का, असा प्रश्‍न म्युनिसिपल मजदूर युनियनने केला आहे. तर सफाई कामगारांकडे उद्यान सफाईसाठी साहित्य नाही. कामगारांची रिक्त पदेही भरली जात नाहीत, बर्‍याच वर्षापासून कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांची पदोन्नती रखडण्यात आली आहे. यासंदर्भात वर्षभरापासून मागणी करण्यात येत आहे. पण पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. पालिकेच्या विविध उद्यानात सध्या 600 सफाई कामगार कार्यरत आहेत. पण अतिरिक्त 200 कामगारांची आवश्यकता आहे. रिक्त पदे असतानाही या जागा भरल्या जात नाहीत. याशिवाय, राणीबागेत कामगार, माळी, सफाई कामगार, अधिकारी यांची एकूण संख्या 105 असून, त्यातील 40 टक्के सफाई कामगार महिला आहेत. 
प्रशासनाकडून सफाईसाठी त्यांना वर्षातून फक्त एक खराटा किंवा झाडूच्या काड्या दिल्या जातात. त्याचा झाडू कामगारांनी बनवायचा. एक फुटाच्या खराट्याने सफाईचे काम व्यवस्थित होत नाही. त्यामुळे मोठे झाडू मिळावेत, म्हणून युनियनने अनेक वेळा मागणी केल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. 100 रुपये खर्च करून, सफाई कामगारांना झाडू खरेदी करावे लागत असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव गोविंद कामतेकर यांनी दिली. याशिवाय, या आंदोलनाची दखल घेत उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी येत्या महिन्याभरात सफाई कामगारांच्या सर्व मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले आहे. पण आश्‍वासन पूर्ण न केल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही कामतेकर यांनी दिला आहे.