Breaking News

बिसलरीच्या प्रकल्पावर छापा

सांगली, 05 -  महापालिकेच्या पाण्याचा वापर बिसलरी प्रकल्पासाठी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सभापती संतोष पाटील यांनी छापा टाकून उघडकीस आणला. शामरावनगरातील दैवज्ञ कॉलनीत एका पत्र्याच्या शेडमध्ये हा प्रकार सुरू होता. 
संबंधित प्रकल्पचालकावर तातडीने कारवाई करण्याबरोबरच व्यापारी पध्दतीने पाणीपट्टी वसुली करण्याचे आदेश त्यांनी दिले. शामरावनगरमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये बिसलरी प्रकल्प सुरू असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा विभागाला मिळाली होती. पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचारी सौ. चौगुले यांनी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन छायाचित्रीकरण करुन प्रशासनाला अहवाल सादर केला होता. मात्र पाणी पुरवठा विभागाकडून नोटिसीचे कारण पुढे करून कारवाईस चालढकल करीत होते. ही बाब स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांच्या कानावर आली. स्वत: सभापती पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत पवार यांनी प्रकल्पस्थळी जाऊन भांडाफोड केला. सर्व पाहणी करून हे सर्व कागदावर आणा, असे आदेश देत पुढील कारवाई तात्काळ करा, असे आदेशही दिले.
प्रकल्पचालकाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. हा प्रकल्प कागदावरच असताना महापालिकेच्या नळाला सरळ मोटार जोडून दररोज हजारो लिटर पाणी शुध्द करुन विक्री होत आहे. पत्र्याच्या शेडमध्ये पाणी शुध्द करण्याची यंत्रणा उभारली आहे. 
लगतच्या पक्क्या इमारतीवर पाण्याच्या दोन टाक्या, तर एक हजार लिटरची एक टाकी होती. तिथे पाणी साठवून ते शुध्दीकरण केंद्रात सोडले जाते. घरात, गाडीत बिसलरी पाण्याचे रिकामे कॅन, बाटल्यांचा साठा होता. सारे काही माहीत असूनही पाणीपुरवठा विभागाकडून कारवाई होत नव्हती. दरम्यान, संबंधितांकडून कूपनलिकेचे पाणी वापरले असल्याचा दावा केला. पण कूपनलिका असलेल्या नागरिकाने पाणी दिले नसल्याचे लेखी दिले आहे. याबाबत पोलिसांत तक्रार करण्याच्या हालचाली सुरू आहेत.