Breaking News

कत्तलीसाठी संशयित 98 जनावरे ताब्यात

मिरज ः दि. 5 - शहर पोलिसांनी काल रात्री बोकड चौकात 98 जनावरे ताब्यात घेतली. त्यामध्ये 92 संकरित (जर्सी) गाई आणि 6 रेडकांचा समावेश आहे. याप्रकरणी मोहसीन मुस्तफा बेपारी (वय 30) आणि मोईद्दीन मुस्तफा बेपारी (वय 35, दोघेही रा. बोकड चौक, मिरज) या दोघांना अटक केली आहे. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 
दोघांविरुद्ध पशुक्रूरता आणि प्राणीसंरक्षण अधिनियम तसेच मुंबई पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. जनावरे मिरजेच्या बाजारात खरेदी केली असून बाहेर विकण्यासाठी पाठवली जाणार होती, असे दोघांनी पोलिसांना सांगितले आहे. रात्री अकरा वाजता बोकड चौकात पोलिसांनी छापा टाकला असता एका मोकळ्या जागेत 98 जनावरे बांधल्याचे आढळून आले. त्यांना पुरेसा चारा-पाणी देण्यात येत नव्हता, अपुर्‍या जागेत बांधली होती असा ठपका पोलिसांनी ठेवला. कत्तलीसाठी आणल्याचा संशय उपाधीक्षक धीरज पाटील व निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी व्यक्त केला. शेजारीच एका टेंपोत (एमएच 10 बीआर 441) एक हजार किलो मांसही सापडले. पशुचिकित्सालयातील डाॅक्टरांनी त्याचे नमुने घेतले आहेत. तपासणीसाठी पुण्याला पाठवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी जनावरे ताब्यात घेऊन त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था केली. त्यांची अंदाजे किंमत 7 लाख 50 हजार रुपये होते. ती विक्रीसाठी आणल्याचे संशयितांनी सांगितले असले तरी खरेदीच्या पावत्या दाखवल्या नाहीत. या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर काल रात्री बोकड चौकात जमाव जमला होता. तसेच आज सकाळी देखील पोलिस ठाणे आवारात गर्दी जमली होती.
महापालिकेचे हात वर
कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेली 98 जनावरे ठेवायची कोठे? असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. सध्यस्थितीत बोकड चौकात आहेत त्याच ठिकाणी बंदोबस्तात ठेवली आहेत. ती ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी महापालिकेला पत्र दिले; मात्र आमच्याकडे व्यवस्था नाही, असे सांगत महापालिकेने हात वर केले. त्यामुळे जनावरांबाबत न्यायालय आदेश देईपर्यंत पोलिसांनाच ती सांभाळावी लागणार आहेत.कसून तपास करणारशहरात प्रथमच इतक्या मोठ्या स्वरूपाची कारवाई झाली आहे. पोलिसांनी ताब्यात घेलेल्या गाई संकरित गोवंशामध्ये मोडतात. त्यांची कत्तल करणे गुन्हा आहे. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत काय, याचा कसून शोध घेतला जाईल. कोणी दोषी आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.