Breaking News

उत्तराखंड; काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द

नवी दिल्ली, 27 -  विधानसभा अध्यक्ष गोविंदसिंह कुंजवाल यांनी शनिवारी रात्री काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द केले आहे.  
सरकार वाचविण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी या नऊ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. यावर निर्णय घेत कुंजवाल यांनी यांचे सदस्यत्व रद्द केले. उत्तराखंड विधानसभेत 28 मार्चला विश्‍वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. हरीश रावत यांनी आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.  शनिवारी हरीश रावत यांनी आपणास लाच आणि खरेदी करण्याचा कसा प्रयत्न केला याविषयीची स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याने देशात पुन्हा राजकीय वादळ उठले. वादग्रस्त व्हिडिओनंतर भारतीय जनता पक्षाने रावत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तर हा आपणाविरोधात रचलेला कट होता, असे समर्थन स्वत: रावत यांनी केले. उत्तराखंडमधील काँग्रेसच्या नऊ आमदारांनी बंडखोरी केल्याने रावत सरकार अल्पमतात आले आहे.