पेशवाईचा नवा अवतार म्हणजे भाजपः आपटे
बुलडाणा (का.प्रतिनिधी) । 05 - शेतकरी संघटनेच्या वतीने भाजपा सरकारच्या विरोधात ‘विश्वासघात पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनंषंगाने 2 मार्च रोजी विश्वासघात पायी दिंडी काढण्यात आली. व त्यानंतर जाहीर सभाही घेण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेस सरकारने शेतकरी विरोधी धोरणे राबविली. त्यानंतर आता सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारही तसेच धोरण राबवित आहे
. पेशवाईचा नवा अवतार म्हणजे भाजपा सरकार आहे. सरकार बदलले; पण धोरणं बदलली नाहीत म्हणून शेतकरी वर्गाने एकजुटीने आपल्या न्याय्य, हक्कासाठी रस्त्यावर येऊन हा लढा लढावा, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कालीदास आपेट यांनी केले. 2 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता स्थानिक दुर्गा चौकात विश्वासघात दिंडीच्या आगमनाच्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
पुढे बोलतांना आपेट म्हणाले की, फडणवीस सरकारने चिखलदर्याच्या विकासासाठी सहाशे कोटी रुपये दिले. नरसिंहवाडीला 121 कोटी रुपये दिले. नाशिकच्या कुंभमेळाव्यावर हजारो कोटी खर्च केले. मेक इन इंडियाच्या गिरगाव चौपाटीवर आयोजित लावणीच्या कार्यक्रमावर सहा कोटी रुपये खर्च केले. उड्डाणपूल उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी फडणवीस सरकार शेतकरी व सामान्य जनता भरीत असलेल्या करांमधून करीत आहे. मग हा पेशवाईचा नवा अवतार आहे, नाही तर काय आहे, अशी उधळपट्टी आम्ही या सरकारला करू देणार नाही, असे सांगून आपेट म्हणाले की तूर, कापूस, सोयाबीन, ज्वारी, धान, केळी, संत्री, कांदे आदी सर्वच शेती पिकं हे मेक ईन इंडिया नाही का? मोदी सरकारवर हल्लाबोल करताना आपेट म्हणाले की, पूर्वी कॉम्प्युटर, विमाने व इतर तंत्रज्ञान विदेशातून आयात व्हायचं, आता या देशात कांदा, तांदूळ, गहू, तूर डाळ आदी सर्वच शेतीमालाची आयात सरकार करते आहे, त्यामुळे शेतकर्यांना त्यांचा शेतीमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराला पत्र लिहून परकीय देशातून येणार्या मिठावर जास्तीत
जास्त कर लावून शेतकर्यांना संरक्षण दिले होते. त्या जाणत्या राजाचे नाव घेऊन भाजपाचे मोदी, फडणवीस सरकार सत्तेवर आले. भाजपाला शिवाजी महाराज कळलेच नसल्यामुळे त्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनकर दाभाडे बोलताना म्हणाले की, सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदीने शेतकर्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करू, असे आश्वासन देऊन शेतकर्यांची मते घेतली व आता सत्तेवर येताच त्यांनी शेतकर्यांकडे पाठ फिरवली आहे. फडणवीस व मोदी सरकारने शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे, म्हणून शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या विश्वासघात दिंडीचे आयोजन असल्याचे दाभाडे म्हणाले. शेतकरी संघटनेचे रमेश बानाईत यांनी सभेचे संचालन केले. यावेळी संतोष रोठे, प्रल्हाद आपेट, नितीन अवचार, गजानन देशमुख, नारायण शिंदे, शेख हातम, रुस्तम दाभाडे यांच्यासह शेकडो शेतकरी हजर होते.