Breaking News

तरुणांनी फूटबॉल खेळाला प्रोत्साहन द्यावे : पंतप्रधान

मुंबई, 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ’मन की बात’च्या माध्यमातून भारतीय क्रिकेट टी-20 विश्‍वचषकात आत्तापर्यंत मिळवलेल्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी संघाचे कौतुक केले. त्याचसोबत 2017 साली भारत ’अंडर 17’ फूटबॉल विश्‍वचषकाचे आयोजन करत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर देशातील तरुणांनी फूटबॉल या खेळाला प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी केले. 
तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी त्यांना काही सल्लेही दिले. सुट्टीच्या काळात काहीतरी नवीन कला शिकण्याचे आणि भरपूर प्रवास करण्याचा सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. ’प्रवास आपल्याला बरेच काही शिकवतो. आपण जे आपल्या घरात आणि शाळेच्या वर्गात शिकू शकत नाही ते आपल्याला प्रवासात शिकायला मिळू शकते,’ असे मोदी म्हणाले. भारतातील तरुणांना प्रवास आणि आव्हानांची आवड आहे. त्यांना नवनवीन स्थळे पाहण्यात रस आहे, असे मोदी म्हणाले. पर्यटनात मोठ्या प्रमाणात व्यवसायनिर्मितीचे सामर्थ्य असल्याचे मोदींनी सांगितले. या भाषणात त्यांनी ’किसान सुविधा अ‍ॅप’चाही उल्लेख केला. एका क्लिकच्या आधारावर शेतकर्‍यांना या अ‍ॅपच्या माध्यमातून खते आणि बी बियाणांची माहिती मिळू शकते, तसेच त्यांना शेती तज्ज्ञांशी संवाध साधता येऊ शकतो, अशी माहिती मोदींनी दिली.