Breaking News

जिल्ह्यासह शहर झाले शिवमय, छत्रपतींचा जयघोष

 अहमदनगर । प्रतिनिधी । 27 - तिथीप्रमाणे येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती सेना व हिंदूत्ववादी संघटनेच्यावतीने जिल्ह्यासह शहरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. शहरातील बसस्थानक चौकातील अश्‍वारुढ  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास राजकीय पदाधिकारी व सेनेच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. 
तसेच शहरातील प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. तसेच रस्ते व चौकांमध्ये भगवे झेंडे लावण्यात आले होते. याबरोबरच पोवाडेही वाजविण्यात येत असल्याने शहर शिवमय व पोवाड्यांनी दणाणून गेले. शहरामध्ये शिवसेना, मनसे, युवा सेना व तुळजाभवानी प्रतिष्ठाणला मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आली. या तिघांबरोबरच हिंदू राष्ट्रसेना ही मिरवणुकीत सहभागी होणार आहे. सायंकाळी 4 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास सेनेचे पदाधिकारी व छत्रपती शिवाजी राजांना मानणार्‍या प्रेंमीनी अभिवादन करुन मिरवणुकीस प्रारंभ केला. मिरवणुकीच्या पार्श्‍वभुमीवर शहरातील सर्वच भागात अप्पर पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदशर्र्नाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक चौकात पोलिस व गस्त पथक आहेत. शहरातील सर्वच 
भागात उपअधिक्षक बजरंग बनसोडे, भोईटे, पोनि. अविनाश मोरे, सोमनाथ मालकर, लक्ष ठेवून आहेत. कोणत्याच मंडळांना डिजे वाजविण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी परवानगीसाठी डिजीटल बेंजो वाद्यास परवानगी द्यावी अशी पळवाट शोधून काढली, मात्र, दुपारी 3 वाजेपर्यंत कोणत्याही मंडळांना सिडी वाजविण्यास पोलिस प्रशासनाने परवानगी दिली नाही. मात्र, सेनेच्या मंडळाने डिजे लावला. मिरवणुकीत डिजे सहभागी झाल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून मिरवणुक संपताच नेहमीप्रमाणे डिजे ताब्यात घेऊन चालक-मालक व मंडळाच्या अध्यक्षाविरुध्द गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. 
दिल्लीगेट, मंगलगेट, चौपाटी कारंजा, माळीवाडा येथे शहर सेनेच्यावतीने आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर कपिलेश्‍वर मित्र मंडळाच्यावतीने भव्य स्टेज उभारुन छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक मुर्ती ठेवण्यात आली होती. जुनी वसंत टॉकीज, बंगालचौक, सबजेल चौक, चितळे रोड, बुरुडगल्ली, बुरुडगाव रोड व इतर भागातही शिवाजी महाराजांचे प्रतिमा ठेवून भव्य स्टेज उभारण्यात आले होते. दरम्यान, सकाळी शहरातील बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास खा. दिलीप गांधी, सुनिल रामदासी, प्रा.शिरीष मोडक, मनेष साठे,तसेच पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
शिवजयंतीच्या पार्श्‍वभुमीवर वेगवेगळ्या गुन्ह्यातील तब्बल शंभर जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले असून कोणतीही गडबड होणार नाही त्यादृष्टीने पोलिस प्रशासनाने नियोजन केले आहे. मिरवणुकीतील मार्गावर पोलिसांनी टॉवर उभारले आहे. फटक्यांची अतिषबाजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. शहरातील मिरवणुक मार्गावरील रस्त्यावर मिळणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. यामुळे अनेक चौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. मिरवणुकीस रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे. दिल्लीगेट येथे मिरवणुकीचे विसर्जन केले जाणार आहे.