Breaking News

लालटाकी परिसरात दुकानांना भीषण आग

 अहमदनगर । प्रतिनिधी । 27 - लालटाकी भागातील गवळी स्मशानभुमीच्या जागेतील शॉपीग सेंटरला पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगेमध्ये सात दुकाने जळाली. तर एका दुकानासमोरील चार कार तसेच दुकानातील मशिनरी व माल असा 50 लाखांच्या आसपास ऐवज जळून मोठे आर्थिक नुकसान झाले. 
मध्यरात्री दीडच्या सुमारास आगीचा प्रकार लक्षात आल्यानंतर मनपा अग्निशामक विभागास पाचारण करण्यात आले. अग्निशामक विभागाचे तीन बंब तसेच राहूरी नगरपालिका, एमआयडीसी विभाग व सप्लाय डेपो (लष्करी विभाग) यांचा प्रत्येक एक बंब अशा सहा बंबाच्या मदतीने पाण्याचा मारा करुन पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले. शॉपीग सेंटरमधील दोन ते तीन दुकाने वाचली. आगीमध्ये रच्चाबंधूचे कार सर्व्हिसेस तसेच बबनराव चांदणे यांचे फर्निचर,बालाजीचे बिल्डिंग मटेरियल,शिवम सायकल सेंटर,कमलेश अ‍ॅटो,नाविन्य अ‍ॅटो व समीर अ‍ॅटो या सात दुकानातील साहित्य जळून खाक झाले. एका दुकानातील कॉप्रेसरचा स्फोट झाल्याने मोठा गोंधळ उडाला. शहर विभाग पोलिस उपअधीक्ष बजरंग बनसोडे, 
पोलिस निरीक्षक अविनाश मोरे व पोलिस पथकाने शनिवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सकाळी या परिसरात नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. दुकान मालकांच्या जबाबावरुन गुन्हा दाखल केला जाणार आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटने आग लागल्याची चर्चा परिसरात सुरू होती.