कुकडी, घोडच्या आवर्तनासाठी शरद पवारांना साकडे घालणार : नागवडे, जगताप
श्रीगोंदा । प्रतिनिधी । 27 - कुकडी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा आहे. परंतु भाजपा सरकार फळबागांना पाणी देण्यासाठी ठोस भूमिका घेत नाही. कुकडी, घोडचे फळबागांना आवर्तन सोडण्यासाठी पुढील आठवड्यात शरद पवार यांना भेटणार आहे, अशी माहिती राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, कुकडी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिक जगताप यांनी दिली.
लोणीव्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथे किसान क्रांती मंडळाच्यावतीने लोणीव्यंकनाथ सोसायटी निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा नागवडे, जगताप, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब गिरमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोपान तरटे होते. नागवडे म्हणाले, घोडमध्ये डिंबेचे पाणी सोडण्यासाठी आम्ही कायदेशीर लढाई केली. यामध्ये काही प्रमाणात यश आले. त्यामुळे घोडला एक आवर्तन मिळाले. त्यावेळी बबनराव पाचपुते यांनी टीका केली. आता कुकडी, घोड कार्यक्षेत्रातील शेतकरी होरपळून निघाले आहेत. भीमा नदीला पाणी सुटण्याची चिन्हे दिसताच पाण्यासाठी आंदोलन करणे, हा बनवाबनवीचा खेळ आहे.
कुंडलिक जगताप म्हणाले, पालकमंत्री असताना पाचपुते यांनी नगर- दौंड रस्त्याकडे लक्ष दिले नाही. तालुक्यात सत्ता परिवर्तन झाले आणि आमदार राहुल जगताप यांनी रस्त्याची दुरुस्ती केली. आता या कामाचे खोटे श्रेय घेण्यासाठी पाचपुते रोज पत्रकबाजी करीत आहेत. कुकडी, घोडच्या आवर्तनप्रश्नी शिवाजीराव नागवडे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार अथवा जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. अण्णासाहेब शेलार म्हणाले, कुकडी, घोड पाटपाण्यासाठी आमदार राहुल जगताप यांच्या एकट्यावर जबाबदारी न टाकता सामूहिक प्रयत्न करावे लागणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये सहमती एक्स्प्रेस कायम ठेवावी लागणार आहे. बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा म्हणाले, आम्ही पाणी प्रश्नावर आंदोलने केली, हे पाचपुते यांना पहावले नाही. सोसायटी निवडणुकीत गावात येऊन त्यांनी प्रचार केल्याने किसान क्रांती मंडळाचे मताधिक्य वाढले. परंतु भविष्यात या प्रयोगाची किंमत पाचपुतेंना मोजावी लागणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी बाळासाहेब गिरमकर, रावसाहेब काकडे, दिलीप काकडे, सुनील पाटील यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास सुभाष शिंदे, सुनील माने, बी. एल. कदम, हेमंत नलगे, विजय नलगे, विजय शेंडे,
शरद गलांडे, रामदास झेंडे, विलास काकडे, मनोज इथापे हजर होते.