Breaking News

वाळूसाठी कृष्णा कोरडी ठेवण्याचा घाट

सांगली, 05 - वाळू उपशाला मोकळे रान मिळण्यासाठी कृष्णा नदी वारंवार कोरडी ठेवण्याचा घाट काही अधिकारी आणि ठेकेदारांनी घातला असल्याची शंका येऊ लागली आहे. जिल्ह्यातील शेतीच्या सिंचनाची अवस्था बिकट झाली आहे. तसेच कृष्णा नदीची लचकेतोड सुरु आहे.
यंदा दुष्काळी स्थिती गंभीर आहे. कोयना, धोम, कण्हेर यासह जिल्ह्यातील मध्यम व लघुपाटबंधारे तलावात पाणीसाठा कमी आहे. पाणी कमी पडण्याच्या शक्यतेने आवर्तने कमी ठेवली जात आहेत. यामुळे कृष्णा नदी वारंवार कोरडी पडू लागली आहे. याचा गैरफायदा जिल्ह्यातील वाळूमाफिया उठवित आहेत. पाणी कमी असल्यानंतर वाळू बेफामपणे उपसा करता येतो, ही आयडिया अफलातून असल्याची लक्षात आल्यानंतर ठेकेदारांनी राजकीय नेत्यांच्या आडाने सर्व यंत्रणाच काबूत ठेवण्याचा उद्योग चालविला आहे. 
याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे म्हैसाळ पाणी योजनेचे आहे. किरकोळ रक्कमेसाठी म्हैसाळ योजना बंद ठेवण्याचा प्रकार कधीच झाला नाहीं. पण गेल्या महिन्याभरात म्हैसाळच्या पाण्याबाबत झालेले राजकारण सर्वश्रुत आहे. पूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये असलेे ठेकेदार आता सत्ताधारी पक्षांच्या वळचणीला गेले असून तेच अशा कारवाया करीत आहेत. यात पाटबंधारे, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी असल्याची शंका येत आहे. राजकीय नेत्यांना पुढे करुन अनेक अधिकारी व ठेकेदारांनी साटेलोटे करुन पाणी कमी व विलंबाने सोडण्याचे कारस्थान करीत असल्याचा दाट संशय आहे. यामुळेच कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत असल्याची 
चर्चा नदीकाठी सुरु आहे. पात्र कोरडे ठेवून रात्रीच्या वेळी वाळू उपसा जोमात सुरु असल्याचे विदारक चित्र कृष्णाकाठी दिसत आहे. यासाठी सर्व अधिकार्‍यांना त्यांचा त्यांचा वाटा दिला जात आहे.