बनावट टिकीट प्रकरणातील मास्टरमाइंड पोलिसच!
बुलडाणा (का.प्रतिनिधी) । 05 - बुलडाणा जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलिस कल्याण निधीसाठी यावर्षी एका आर्केस्ट्राचे आयोजन 28 फेबु्रवारी रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची बनावट टिकीटे छापण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान पोलीस कल्याण निधीसाठी आयोजित आर्केस्ट्रॉची बनावट तिकिटे छापणारा मास्टरमाइंड पोलीस पेट्रोलपंपाचा व्यवस्थापक पीएसआय बबन सनगाळे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. येथील पोलीस कवायत मैदानावर 28 फेब्रुवारी रोजी पोलीस कल्याण निधीसाठी आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. याच्या दोन दिवसाआधी 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी एक लाख रुपयाची बनावट तिकिटे जयस्तंभ चौकामधील नारखेड प्रिटिंग प्रेसमधून पोलिसांनी जप्त केली.
तसेच प्रेस मालक पंकज नारखेड व सहकारी पुरुषोत्तम बोर्डे यांच्यावर भादंविच्या 468, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीदरम्यान दोन्ही आरोपींकडे प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, प्रकरणाचा मास्टरमाइंट पीएसआय सनगाळे असल्याचे सत्य पुढे आले. कल्याण शाखेतील पीएसआय संगीता खेडेकर व हेकाँ नदीम काझी यांचे पीएसआय सनगाळे यांच्यासोबत अनेकदा वाद झाले होते. त्यामुळे खेडेकर व काझी यांचा वचपा काढण्यासाठी पीएसआय सनगाळे याने पोलीस कल्याण निधी आर्केस्ट्राची संधी निवडली.या आर्केस्ट्राच्या बनावट तिकिटा छापून हे कारस्थान रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले. टिकीट छापण्याची जबाबदारी असलेल्या नारखेड व बोर्डे यांना सनगाळे यांनी लक्ष्य बनवून हा कट रचल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणी पीएसआय बबन सनगाळे यांना मुख्य आरोपी बनविण्यात आले असून, त्याला अटक करण्यासाठी शहर पोलिसांची कार्यवाही सुरू आहे.