पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत 30 मीटर लांबीचे भुयार सापडले!
श्रीनगर, 05 - पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत 30 मीटर लांबीचे भुयार खोदल्याचे शुक्रवारी उघड झाले आहे. तेथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची गस्त होती.
पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याला दोन महिने उलटल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या शोधमोहिमेत आर एस पुरा क्षेत्रात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेलगत छुपा बोगदा सापडला आहे. या बोगद्यावाटे सीमेपलीकडून देशात घुसखोरीचा कट असावा, असा संशय आहे. अमरनाथ यात्रा जवळ आली असतानाच हा बोगदा आढळल्याने मोठा घातपाताचा कट उधळला गेल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे. सीमा सुरक्षा दलाच्या अल्ला माई दा कोठी या चौकीजवळच्या परिसरात हा बोगदा पोहोचला आहे. तो जमिनीखाली दहा फुटांवर असून ते तीन गुणिले चार व्यासाचा आहे. पाकिस्तानच्या भूभागातून हा बोगदा सुरू होत आहे. अर्थात भारताच्या हद्दीत 30 मीटपर्यंत तो आला असला तरी तारांच्या कुंपणापलीकडे तो उघडला मात्र गेलेला नाही. त्यामुळे तो अपूर्णावस्थेत आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या जम्मू आणि काश्मीर विभागाचे महानिरीक्षक आर. के. शर्मा यांनी दिली. या बोगद्यावाटे अतिरेकी तसेच शस्त्रास्त्रांचीही तस्करी करण्याचा कट असावा, असे ते म्हणाले.
या परिसरातील जमीन पोकळ असल्याचा संशय आल्यानंतर खोदकाम केल्यावर हा बोगदा आढळला. पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्यांसोबत तात्काळ झालेल्या ध्वजबैठकीत हा मुद्दा मांडला गेला असून भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. 2012पासून बोगदा उघडकीस येण्याची ही चौथी घटना आहे.