भूमाता ब्रिगेडच्या महिलांना 7 मार्च रोजी रोखणार
अहमदनगर । प्रतिनिधी । 06 - केवळ प्रसिद्धीच्या स्टंटसाठी शनिशिंगणापूर चौथर्यावर जाण्याचा अट्टाहास करणार्या भूमाता ब्रिगेड महिलांना ज्याप्रमाणे रोखण्यात आले, त्याचप्रमाणे 7 मार्च या महाशिवरात्रीच्या विशेषपर्वाच्या दिवशी हिंदूंच्या धार्मिक प्रथा, परंपरा मोडण्याच्या उद्देशाने श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्याची चेतावणी देणार्या भूमाता ब्रिगेड महिलांना सर्व हिंदुत्त्वनिष्ठ संघटना मोठया संख्येने उपस्थित राहून रोखतील, असे हिंदू जनजागृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, प्रत्येक देवस्थानच्या निरनिराळ्या प्रथा, परंपरा असतात. त्याप्रमाणे 12 ज्योर्तिलिंगापैकी एक असणार्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू महिला आणि पुरुष यांना प्रवेश आहे. मात्र गर्भगृहात केवळ सोवळे नेसलेल्या अर्धवस्त्रधारी पुरुषांनाच प्रवेश आहे. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी भारताच्या तत्कालिन महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, तत्कालिन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया आदी मोठे पदे भूषविलेल्या महिलांनी दर्शन घेताना येथील प्रथा, परंपरेचे पालन केले आहे. इतकेच काय, तर गावात राहणार्या 1200 स्थानिक महिलांनीही ही प्रथा मोडू नये म्हणून स्थानिक प्रशासनाला सह्यांचे निवेदन दिले आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक त्र्यंबकेश्वर येथे येत असतात. अशावेळी भूमाताच्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे जर झाले तर त्यांचे दायित्व हे प्रशासनाचेच असेल. त्यामुळे पोलिस आणि प्रशासन यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या ब्रिगेड महिलांना तात्काळ नाशिक जिल्हाबंदी घोषित करावी. वारंवार असे आंदोलन करून जनतेला वेठीस धरुन कोट्यवधी रुपयांची हानी केली जात आहे. यामागे शासनाला अस्थिर करण्यासाठी विरोधी पक्षांची तर फूस नाही ना, हे तपासण्यात यावे. तसेच भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनामुळे होणारी आर्थिक हानीची वसुली आणि कठोर कायदेशीर कारवाईची मागणी या पत्रकान्वये करण्यात आली आहे.