सहा हजार शेतकर्यांना तडाखा
अहमदनगर । प्रतिनिधी । 06 - अवकाळी पावसाने कांदा व फळबागा भुईसपाट झाल्या असून जिल्ह्यातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे नगर, श्रीगोंदा, नेवासा, संगमनेर, अकोले आणि कोपरगाव तालुक्यातील 85 गावांतील सहा हजार शेतकर्यांवर आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. वादळी वार्याने काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याने संसार उघड्यावर आले आहेत.
अगोदरच शेतकरी दुष्काळाची झळ सोसत असताना अवकाळीचे अस्मानी संकट आले आहे. गत पाच दिवसांत 85 गावांत वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 6 हजार 392 शेतकर्यांच्या 3 हजार 451 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, डाळींब, आंबा यांसारख्या नगदी पिकांना तडाखा बसला आहे. काही भागात गारपीटही झाली. गारपिटीने आंब्याचा मोहर गळाला. कांदा शेतात भिजला. गारपिटीने शेकडो एकरवरील डाळिंबाच्या बागांची नासाडी झाली. वादळी वार्याने जिल्ह्यातील 26 घरांची पडझड झाली असून, वीज पडून 18 जनावरे दगावली आहेत. शेतातील पिके काही क्षणात भुईसपाट झाली. सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला असून तो साठविणे यामुळे कठीण होऊन बसले आहे. त्यात दर घसरल्याने अनेक शेतकर्यांनी पदरमोड करून कांदा साठविण्यासाठी चाळी तयार केल्या. पण कांदा भिजल्याने तो अधिक काळ साठविणे शक्य होणार नाही. त्यामुळे मिळेल त्या भावाने कांदा विकावा लागणार असल्याने झालेला खर्चही वसूल होतो की नाही, अशी भिती शेतकर्यांतून व्यक्त होत आहे.