Breaking News

केंद्रीय वरिष्ठ अधिकार्‍यांची लासलगावी कांदा उत्पादकांशी चर्चा

लासलगाव/प्रतिनिधी। 14 -  देशातील इतर राज्यांतून कांद्याची वाढलेली आवक आणि मागणीत घट झाल्याने राज्यासह जिल्ह्यात कांद्याच्या भावात घसरण झाली असून, या पार्श्‍वभूमीवर दिल्ली येथील केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाचे संचालक झाकीर हुसेन व उपसंचालक दिनेश कुमार या दोन वरिष्ठ अधिकार्यांनी कांदा उत्पादकांशी चर्चा करून माहिती घेतली.
कांदा लागवड, उत्पादनाची यांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध होत नाही. तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करून कांदा पिकाचे नुकसान टाळता येईल का, याबाबत माहिती संकलित करून कांदा उत्पादकांचा व ग्राहकांना समाधानकारक भाव कशा प्रकारे उपाययोजना करून मिळवून देता येईल याबाबत आपण अहवालात माहिती देणार आहे, असे केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाचे संचालक मोहमंद झाकीर हुसेन व दिनेशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. वरिष्ठ अधिकारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट दिल्यानंतर सभापती नानासाहेब पाटील, संचालक बबनराव सानप, राजाराम दरेकर, तानाजी पूरकर, वैभव तासकर, सोमनाथ इकडे, राजाराम मेमाणे, सचिव बी.वाय. होळकर, पणन महासंघाचे सहाय्यक व्यवस्थापक चंद्रशेखर बारी, तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे, महसूल निरीक्षक चंद्रशेखर नगरकर, नरेंद्र वाढवणे यांच्यासह कांदा उत्पादकांशी चर्चा केली. त्यानंतर व्यापारीवर्गाकडून कांदा उत्पादकांच्या कांदा उत्पादनाचा खर्च, लिलावात मिळणारा भाव, भविष्यातील कांदा आवक स्थिती याची माहिती देण्यात आली.