मुख्यमंत्र्यांनी भूखंड परत घ्यावा: पृथ्वीराज चव्हाण
मुंबई, प्रतिनिधी, दि. 08 - अभिनेत्री हेमामालिनी यांना नृत्य अकादमीसाठी ओशिवरामध्ये दिलेल्या भूखंडावरून वादंग माजल्यानंतर राज्य सरकारने आता प्रचलित कायदा बदलण्याचा विचार सुरू केला आहे. यासंदर्भातला 1983 चा महसूल कायदा बदलून नवा कायदा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी महसूल सचिवांसोबत चर्चा केल्याचे समजते. हा भूखंड सरकारने परत घेण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने हेमामालिनी भूखंड प्रकरणाची गुंतागुंत वाढली.
चव्हाण म्हणाले, हेमामालिनी यांच्या नृत्य अकादमीला ओशिवरा येथील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड 70 हजार रुपयांत देण्याचा निर्णय महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी घेतल्यानंतर या निर्णयावर चोहोबाजूंनी टीका सुरू झाली. यासंदर्भात हेमामालिनी यांना दिलेला भूखंड सरकारने पुन्हा काढून घेतल्याची दोन दिवसांपासून चर्चा आहे. प्रचलित कायदा बदलण्याबाबत महसूल विभागाचे प्रधान सचिव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त असताना या निर्णयाबाबत महसूलमंत्री एकनाथ खडसे
यांना थांगपत्तादेखील नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंना अंधारात ठेवून सरकार निर्णय घेतेय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आदर्श गृहनिर्माण संस्थेत झालेल्या गैरव्यवहारानंतर काँग्रेस आघाडी सरकारने प्रचलित कायदा बदलण्याबाबत तत्कालीन सरकारमध्ये चर्चा झाली होती. याचाच एक भाग म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणत्याही संस्थेला एकही भूखंड दिला नाही, असेही त्यांनी सांगितले.
खासगी संस्थांना दिलेले भूखंड लीज संपल्यावर पुन्हा काढून घेण्याचा निर्णय झाला होता. युती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबतची विधाने केली होती. मात्र मुख्यमंत्री कुणाच्या तरी दबावापुढे झुकत असल्याचे हेमामालिनी प्रकरणावरून सिद्ध होते. हेमामालिनी यांच्या संस्थेला दिलेला भूखंड मुख्यमंत्र्यांनी पुन्हा परत घ्यावा.