Breaking News

पुणेकरांच्या मागण्यांबाबत विधी विभागाच्या सचिवांशी चर्चा करणार ः रावते

 पुणे (प्रतिनिधी)। 08 - हेल्मेटच्या वापराबाबत पुणेकर नागरिकांच्या मागण्यांबाबत विधी आणि न्याय विभागाच्या सचिवांशी चर्चा केली जाईल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे सांगितले.
दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट न वापरल्याबद्दल पुणे वाहतूक पोलिसांकडून गेली दोन दिवस कारवाई केली जात आहे. त्यास होणार्‍या विरोधाबाबत पुणेकरांच्या भावना समजून घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधान भवन येथे बैठक झाली. त्यावेळी श्री. रावते बोलत होते. 
बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, आमदार लक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, नीलम गोर्‍हे आदी उपस्थित होते.
परिवहनमंत्री रावते यांनी सांगितले की, मोटार वाहन विषयक सर्व कायदे केंद्र सरकारने केलेले आहेत. त्यामध्ये बदल करण्यास राज्याला अधिकार नाही. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. यासमितीला रस्ते सुरक्षा बाबत काय उपाययोजना केली जाते याबाबतच अहवाल द्याव लागतो. 
त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच राज्यात सर्वत्र हेल्मेट वापराबाबतचे नियम लागू करण्यात आले आहेत. केवळ पुण्यासाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आलेले नाही.
हेल्मेट वापरण्याबाबत पुणेकरांनी ज्या भावना व्यक्त केल्या किंवा अडचणी सांगितल्या त्याबाबत विधी आणि न्याय विभागाच्या सचिवांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर त्याबाबत न्यायालयातही मत मांडले जाईल, असे परिवहनमंत्री रावते यांनी सांगितले.
पालकमंत्री बापट यांनी सांगितले की, अपघाताचे वाढते प्रमाण पाहता हेल्मेट वापरणे आवश्यकच आहे. पण त्यासाठीची सक्ती करण्यापुर्वी प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. मोठे रस्ते, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करायला हवे. हेल्मेट सक्ती करण्याऐवजी त्याबाबतची सवय लावून घ्यायला हवी.
यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, नीलम गोर्‍हे यांनीही आपले मत व्यक्त केले. बैठकीस पोलीस आयुक्त के.के. पाठक, पोलीस अधीक्षक जय जाधव, वाहतूक विभागाते उपायुक्त सारंग आवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, परिवहन विभागाचे योगेश बाग, अनिल वळीव आदी उपस्थित होते.
तत्पुर्वी पुण्यातील विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी हेल्मेटबाबत आपल्या भावना मांडल्या. 
यावेळी माजी आमदार विनायक निम्हण, म्हाडाचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे, नगरसेविका रूपाली पाटील, सुर्यकांत पाठक, संदीप खर्डेकर, शैलेश गुजर, विवेक वेलणकर, शिरीष आपटे, बाबासाहेब धुमाळ, शिवा मंत्री, श्याम झंवर, राजेश पळसकर, शिवाजी शेळके, दत्ता सगरे, प्रदीप निफाडकर यांनी निवेदन व्यक्त केले.