भाजप सरकार देशद्रोही - राहुल गांधी
नवी दिल्ली, 14 - जेएनयूत घोषणाबाजी करणारे विद्यार्थी देशद्रोही नसून त्यांचा आवाज दाबणारे सरकार देशद्रोही आहे असे वक्तव्य करुन राहुल गांधींनी देखील या वादात उडी घेतली आहे. जेएनयूमध्ये घोषणाबाजी करणार्यांमध्ये डी. राजा यांच्या मुलीचा समावेश होता, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.
डी. राजा यांच्या मुलीच्या समर्थनार्थ डाव्या पक्षाचे आणि काँग्रेसचे नेते एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर राहुल गांधींनी देखील जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र त्यापूर्वी अभाविप आणि इतर विद्यार्थी संघटनांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले. यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलरशी केली. मात्र अभाविप आणि इतर विद्यार्थी संघटनाचा आक्रमक पवित्रा पाहून राहुल गांधींनी दुसर्या गाडीने बाहेर पडावे लागले. जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या देशविरोधी घोषणाबाजीला नवे वळण मिळाले आहे. घोषणा देणार्यांमध्ये सीपीएम नेते डी. राजा यांची मुलगी देखील होती, असा दावा भाजप नेते महेश गिरी यांनी केला आहे.
डी. राजा आणि सीपीएम नेते सीताराम येचूरी यांनी याप्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. एखाद्या घटनेवरुन संपूर्ण जेएनयू विद्यापीठाला देशद्रोही ठरवणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी जेएनयू कॅम्पसमध्ये काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. भारतात अशांतता पसरवण्याबरोबरच काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणांचा यात समावेश होता. याप्रकरणी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्यालाल कुमार यांच्यासह 10 जणांवर देशद्रोहाचे खटले दाखल केले गेले आहेत. यापैकी तिघा जणांना पोलिस कोठडीत ठेवले गेले आहे, तर इतर काही जण फरार आहेत.