दुष्काळमुक्तीसाठी सूर्योदय पुन्हा एकदा सरसावले
बीड, 15 - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, वंचित घटकातील मुले व विद्यार्थी यांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणार्या राष्ट्रसंत भय्यू महाराज प्रणीत सूर्योदय परिवाराने पुन्हा एकदा दुष्काळमुक्तीचे काम हाती घेतले आहे. मराठवाड्यातील दोनशे नदी, नाले व ओढ्यांच्या रुंदीकरण आणि खोलीकरण कामाचा प्रारंभ तालुक्यातील सिरस पारगाव येथे शनिवारी झाला.
राष्ट्रसंत भय्यू महाराज प्रणीत सूर्योदय परिवाराने जिल्ह्यात कृषी तीर्थ केंद्रातून शेतकर्यांना मोफत सल्ला, पाणीपुरवठ्यासाठी टँकर, प्लास्टिक टाक्या, पशू आणि पक्ष्यांच्या पाण्यासाठी मातीची भांडी, अल्पभूधारक शेतकर्यांना मोफत बियाणे, आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या पत्नीला रोख मदतीबरोबरच त्यांचा आरोग्याचा विमाही उतरवून दिला. विद्यार्थ्यांना अधिकारांबरोबरच कर्तव्याची जाण व्हावी यासाठी यंदा दहा हजारांवर विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. दरम्यान, पर्जन्यमान कमी असले तरी पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीतच मुरावे यासाठी सूर्योदय परिवाराने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मराठवाड्यात लोकसहभागातून दोनशे नदी, नाले व ओढ्यांचे खोलीकरण करण्याचा निर्णय सूर्योदय परिवाराने घेतला असून त्याची सुरवात बीड तालुक्यातून झाली आहे. तालुक्यातील मोची पिंपळगाव येथे आमदार जयदत्त क्षीरसागर व पालिका गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून हे काम करण्यात येईल. तर पारगाव सिरस येथे शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष दिलीप गोरे यांच्या पुढाकारातून हे काम होईल.