मुलीचा बदला घेण्यासाठी व्याह्यास नित्रूडमध्ये जाळले
बीड, 15 - एक वर्षापूर्वी मुलीला जाळल्याचा राग मनात धरून तिच्या माहेरच्या लोकांनी व्याह्याला जाळल्याची घटना नित्रूड (ता. माजलगाव) येथे दोन दिवसांपूर्वी बुधवारी (ता.दहा) घडली. जाळलेल्या शेख दस्तगीर याचा उपचारादरम्यान गुरुवारी (ता. 11) मृत्यू झाला. या प्रकरणी शुक्रवारी 12 जणांविरुद्ध दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. जुलै 2014 मध्ये चन्नीबी हिला सासरच्या मंडळींनी अंगावर रॉकेल टाकून जाळले होते.
माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथील शेख दस्तगीर शेख महेमूद यांचा मुलगा मुस्तफा याच्यासोबत गावातीलच सय्यद आलम यांची मुलगी चन्नीबी हिचा विवाह पंधरा वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर पती-पत्नी व सासरच्या मंडळीत कौटुंबिक वाद निर्माण झाले. दरम्यान, जुलै 2014 मध्ये चन्नीबी हीस सासरच्या मंडळींनी अंगावर रॉकेल टाकून जाळले होते. या प्रकरणी शेख दस्तगीर, त्याचा मुलगा मुस्तफा व सासू यांच्याविरुद्ध दिंद्रुड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी माजलगाव सत्र न्यायालयास चार्जशीट दाखल केले होते. तसेच या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, बुधवारी (ता. दहा) शेख दस्तगीर हा आपले व्याही सय्यद आलम यांच्याकडे असलेल्या नातवास भेटण्यासाठी सकाळी गेले. या वेळी सय्यद आलम व त्याच्या 11 साथीदारांनी त्यांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यामुळे ते मोठमोठ्याने किंचाळू लागले. त्यांना जवळपासच्या लोकांनी तत्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत ते 70 टक्के भाजले होते.
उपचारादरम्यान, गुरुवारी (ता.11) शेख दस्तगीर याचा मृत्यू झाला. शेख दस्तगीर शेख महेमूद यांच्या मृत्युपूर्व जबाबावरून दिंद्रुड पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री सय्यद आलम याच्यासह सय्यद निजाम आलम, सय्यद शामद आलम, सय्यद चुन्नू आलम, सय्यद वाहेद आलम, सय्यद रुक्साना शामद, राशदबी आलम, सय्यद अजीम शामद, सय्यद भैय्या शामद, शेख इसाक शेख रशीद व शेख रसूल शेख रशीद या 12 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.