प्रजासत्तादिनी खटाव तालुक्यातील अर्जुन मोहिते यांना विशेष पदक प्रदान
सातारा, 15 - खटाव तालुक्यातील डिस्कळ येथील अर्जुन हरिबा मोहिते यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सावरगाव येथे नक्षलवाद्यांशी दोन हात करत महाराष्ट्र पोलिसांची मान उंचावली आहे. याबद्दल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या हस्ते नुकताच विशेष पोलीस पदक देवून त्यांना सन्मानीत करण्यात आले.
अर्जुन याने नाशिकमधील पीटीसी सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याची गडचिरोली जिल्ह्यातील सावरगाव विभागात प्रशिक्षणार्थी अधिकारीपदी नेमणूक झाली. अल्पावधीत त्याने सावरगाव, मगदंड पहाडी व इतर परिसरात जनजागृतीच्या माध्यमातून शासकीय कामकाज केले. 6 ऑगस्ट, 2015 रोजी अर्जुन व त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी चंद्रकांत पाटील हे मगदंड पहाडी परिसरातून कर्तव्य बजावत होते. त्यावेळी अचानक जंगलातून नक्षलवाद्यांनी पोलीस अधिकार्यांवर बंदुकिच्या फैरी झाडल्या. मात्र, समयसूचकता व धाडसाने या दोघांनी नक्षलवाद्याचा हल्ला परतवला. या गोळीबाराच्या घटनेमध्ये अर्जुन मोहिते यांना दोन गोळ्या लागल्या तर चंद्रकांत पाटील जखमी झाले. या घटनेची विशेष दखल घेवून शासनाने 26 जानेवारी, 2015 रोजी अर्जुन मोहिते यांचा पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या हस्ते विशेष पदक देवून सन्मान केला.