शिवसेना म्हसवड पालिकेची निवडणुक स्वबळावर लढवणार : संजय भोसले
सातारा, 15 - म्हसवड येथील नगरपालिकेच्या आगामी पंचविर्षिक निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती माण तालुकाप्रमुख संजय भोसले यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने, शिवसेना उपनेते व सातारा-सांगली संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्याच्या बैठकीत बोलताना भोसले म्हणाले, म्हसवड शहराला राजकीय इतिहास आहे. या शहराने शिवसेनेची पाठराखण केली आहे. शहरात शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. 1995 च्या शिवशाही सरकारच्या काळात शहराचा पाणी प्रश्न तत्कालीन नगरविकासमंत्री व म्हसवडचे सुपुत्र रवींद्र माने यांच्या प्रयत्नातून सोडवण्यात आला. नगपालिकेत शिवसेनेचे गणेश रसाळ नगरसेवक म्हणून निवडून आले होते. शिवसेना ही 80 टक्के समाजकारण करणारी संघटना असून याच समाजकारणाच्या जोरावर आम्ही आजी-माजी ज्येष्ठ शिवसैनिक, पदाधिकारी एकदिलाने पक्षाच्या आदेशानुसार संघटितपणे लढा उभारुन नगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढून जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. म्हसवडचे
शहरप्रमुख राहुल मंगरुळे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी उपतालुका प्रमुख बाळासाहेब मुलाणी, धनाजी शिंदे, मिलिंद रावळ, शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.